ऑस्ट्रेलिया दौरा

पुणे विद्यापीठात विद्यावाचस्पती पदवीसाठी संशोधन करीत असताना मी करीत असलेल्या संशोधन संदर्भात मेलबोर्न (ऑस्ट्रेलिया) येथून मला बोलावण्यात आले. पहिलाच विमान प्रवास म्हटल्यावर पहलटकरणीचा आनंद झाला होता. पासपोर्ट (पारपत्र), व्हिसा अशा शब्दांची ओळख व्हायला लागली. या सगळ्या धामधुमीत जाण्याच्या आदल्या दिवशी व्हिसा मिळाला. "व्हिसा' म्हणजे पारपत्रावर मारलेला एक शिक्का असतो हे पहिल्यांदाच कळले. अर्थात तोपर्यंत पासपोर्टची किंमत कळली होतीच. जसजसे जाण्याचे दिवस जवळ येऊ लागले. तसतसे लग्न जमलेल्या मित्राला, त्याचे मित्र अनेक विविधांगी सल्ले देतात व तो बावचळून, गोंधळून जातो, तसेच माझेही काहीसे व्हायले लागले. कारण यापूर्वी विमानाने प्रवास न केलेले असे मित्र सल्ला देत होते. अर्थात ते फुकटचेच, कारण त्यात त्यांच्या बापाचं काहीच जात नव्हतं. मी मात्र पटेल तोच सल्ला अत्यंत गांभीर्याने घेत होतो. सल्ले तरी काय? पारपत्र ठेवण्यासाठी बंडीवजा बनियान विकत घ्या, मी कापड बाजारात हिंडून दोन तास घालवून तशा प्रकारची बंडी मिळविली. लाडू, चिवडा, पुरणपोळ्या, शंकरपाळ्या , रव्याचे लाडू असं काय-काय बायकोने आणि आईने प्रेमाने करून दिले.

वऱहाड निघालं मेलबोर्नला !
मुंबईला जाताना सगळं घर सोडवायला आलं होतं. अर्थात प्रा. लक्ष्मण देशपांडे यांच्या "वऱ्हाड निघालं लंडनला' नाटकाची आठवण सातत्याने येत होती. मुंबईतले बरेच नातेवाईक सोडवायला आल्यामुळे जरा जास्तच दडपण आले होते. लग्नानंतर पुन्हा एकदा पहिल्यांदाच टाय-कोट घातल्याने आधीच बुटका असलेला मी जास्तच बावळट दिसत होतो. अर्थात एखाद्याने गळा दाबावा व त्याचा ताण चेहऱ्यावर यावा अशी काहीशी अवस्था झाली होती. सोडवायला आलेले सगळे लटांबर सोडून एकदाचा आत गेलो. कसल्या-कसल्या बऱ्याच चाचण्यांमधनं आत जावं लागलं, नुकतीच ऍथ्रॅक्‍सची साथ येऊन गेलेली असल्याने चाचण्या जरा कडकच होत्या. ती एक्‍सरे तपासणी, हात वर करून जाणे, बॅग उघडणे, लावणे, अतिशय प्रेमाने दोन दिवस खचून भरलेली बॅग त्याने अर्ध्या मिनिटातच विस्कटून टाकली होती. सिंगापूरच्या  विमानाने जाणार असल्याने तोकड्या कपड्यातल्या सुंदर म्हणाव्या इतक्‍या हवाई सुंदरी फार पूर्वीची ओळख असल्यासारख्या हस्तांदोलन करत होत्या. काहींच्या तर गालाला गालही घासत होत्या. सुदैवाने(? )माझ्यावर तो प्रसंग आला नाही.

शेजारी 'करोडपती' नवाथे
एकदाचा विमानात जाऊन बसलो. बसल्यावर शेजारी कुणीतरी येऊन बसण्याची वाट पाहत होतो. बेल्ट बांधायचा असतो.. असं अनेक वेळा ऐकलं होतं, पण बांधण्याचे धाडस करत नव्हतो. कारण चुकलं तर? ही भीती मनात होती. कुणीतरी शेजारी येऊन बसल्याचं जाणवलं. सहज बघितलं तर चेहरा ओळखीचा वाटला. चार-पाच मिनिटे आठवायचा प्रयत्न केला नी लक्षात आलं, यांना आपण टी.व्ही.वर पाहिलेलं आहे. काही केल्या नाव आठवेना. तेवढ्यात एक हवाई सुंदर (हे ही तेवढेच देखणे असतात. देखणे आणि आखीव- रेखीव.) एक वाफाळलेला रुमाल घेऊन आला नेहमीप्रमाणे कुणी काही देतंय म्हटल्यावर घ्यावे! या उक्तीप्रमाणे तो हातात घेतला. त्याचं काय करायचं? हा यक्ष प्रश्‍न. इकडं तिकडं बघितल्यावर लक्षात आलं सगळे लोक त्याने आपला चेहरा हात, कान, मान असं काय काय पुसत होते. मग काय ..आधीच गांगरून गेलेलो होतो, तसं केल्यावर मलाही बरं वाटलं आणि तेवढ्यात एकदम अचानक आठवलं. माझ्याशेजारी बसलेला माणूस हा नुकताच "बिग बी'च्या "कौन बनेगा करोडपती' कार्यक्रमातून कोट्याधीश झालेला हर्षवर्धन नवाथे आहे. मग काय आमची थोड्याच वेळात गट्टी जमली. मी अगदी बाळबोधपणे त्या कोटी रुपयाचं काय करणार? असा प्रश्‍न विचारला आणि तेवढ्यात धडाधड घोषणा सुरू झाल्या. हे करा.. ते करा.. आणि विमानाला आग लागली तर हे करा, विमान समुद्रात पडले तर ते करा, अशी सरबत्ती सुरू झाली. मागच्याच महिन्यात विमान दुर्घटनेत शंभर लोक समुद्रात बुडून मृत्यूमुखी पडली होती ही बातमी सातत्याने मनामध्ये घर करून राहिल्याने एवढ्या थंडीतही दरदरून घाम फुटला. बेल्ट लावा, खिडक्‍यांच्या काचा उघडा,.. या सूचना ऐकाव्यात की शांत बसावे असं द्वंद्व सुरू झालं होतं. नवाथेंनी बेल्ट लावायला मदत केली आणि खाडखाड आवाज सुरू झाला. निवेदिकेचाही आवाज वाढला. जाकीट कसं घालायचं, मास्क कसा लावायचा.. या सगळ्या धांदलीत कोटी रुपयाचं काय करणार हे नवाथे सांगत होते. माझं मात्र काडीचं लक्ष नव्हतं. मी मात्र हं-हं करत होतो. त्यांना मी एक उत्तम श्रोता वाटत होतो आणि त्याचं सांगणं चालूच होतं.

शेवटी एकदाचा 'टेक ऑफ'
एकदाचं विमान सुरू झालं आणि जेवढे म्हणून देव आठवतील त्या सगळ्यांचा धावा सुरू झाला. बैलगाडीने दुडक्‍या चालीनं चालावं तसं विमान डकाव-डकाव करत चाललं होतं. कधी हात घट्ट ठेवून तर कधी डोळे मिटायचा प्रयत्न, कधी बाहेर खिडकीतून बघणं, कधी नवाथेंच मधूनचं ऐकणं, निविदिकेचं ऐकणं असं मन वढाय वढाय चालू होतं आणि तेवढ्यात विमानाने जास्तच वेग घेतला, तसतशी छाती धाडधाड करू लागली आणि "वऱ्हाड निघालंय लंडनला'मधल्या एकपात्री नाटकातलं ते पोरगं "इमाइन खाली पडलं तर?' असा प्रश्‍न करतं. तेवढंच आठवायला लागलं.भीती जास्तच वाढायला लागली. एकदाचा टेक ऑफ झाला आणि खिडकीतनं धारावीची बकाल झोपडपट्टी दिसू लागली. काही क्षणात अथांग समुद्र आणि काही मिनिटांतच पांढरे-शुभ्र ढग. मधला काळ भीतभीतच गेला होता. मनाला सारखं बजावत होतो. दुसरा विचार करुयात. पण त्या माणसाच्या माकडाचा विचार करू नकोस. सारखं "विमान कोसळणं', याशिवाय दुसरा कसलाही विचार मनात येत नव्हता.

विमान प्रवास नव्हता स्वप्नात...
तेवढ्यात अतिशय मधाळ शब्द हळूवार कानावर आले. हवाई सुंदरी, काय ड्रिंक्‍स घेणार याविषयी विचारत होती. सवयीप्रमाणे शेजारी काय घेतायेत त्याप्रमाणे मी सांगितलं. बाहेरचं वातावरण आता हळूहळू बदलत जाऊन स्वच्छ पांढऱ्या रजईची दुलई अंथरल्याप्रमाणे ढग चकाकत होते. सगळीकडे फक्त ढग आणि ढगच ढग. आता मात्र त्या शांत शीतल वातावरणामुळे का कुणास ठाऊक पण लहानपण आठवायला लागलं पुढच्या एक / दीड तासात सगळं आयुष्य अलवारपणे नजरेसमोरून तरळून गेले. लहानपणी गावच्या देवनदीत, डोहात डुबताना विमान दिसलं म्हणून "इवाइना, इवाइना साखळी सोड' म्हणणारे आम्ही कधी काळी त्या विमानात बसू असं स्वप्नातही आलं नव्हतं. हा काळ म्हणजे ७२ चा दुष्काळ. पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष. म्हणून आंघोळीसाठी सुद्धा दोन-चार किलोमीटर साचलेल्या डबक्‍यात रूढ अर्थाने ज्याला डोह म्हणायचो तिथं जावं लागायचं. हुलग्याचं कोरड्यास आणि हुलग्याच्याच भाकरी, मिलोचा गहू, सुकटी मिळाली म्हणजे आहाहा व्हायचं, आईतर मला भाकरीचा पापुद्रा चपाती म्हणून द्यायची. बदल म्हणून हुलग्याचं मांडगं. अशा दारिद्य्रात राहिलेलो. कधी काळी विमानाने प्रवास करेन असं खरंच कधी वाटलं नव्हतं.सुरुवातीला कृष्णधवल व नंतर रंगीत चित्रफितीप्रमाणे सगळं समोरून जात होतं, खरं सांगायचं तर माणसाच्या चार / पाच वर्षांचा काळ फार आठवत नव्हता पण लहानपण मात्र सगळं नजरेसमोरून चाललं होतं. हा पेयपानाचा प्रताप होता की, ढगांच्या मखमली सहवासामुळे आलेल्या नशेचा प्रभाव.. कोणास ठाऊक. नंतरच्या काळात थोड्या-थोड्या वेळाने काहीना काही खायला मिळत होते. तेवढ्यात सिंगापूर आले. सिंगापूरमध्ये पाच तास थांबायचे असल्याने उगाच उकडे-तिकडे फुलपाखरासारखं फिरत होतो. पुढचा प्रवास सिंगापूर ते मेलबोर्न. सराईत गुन्हेगारासारखं आता विमानात बसण्याच्या त्या सगळ्या प्रक्रियेला सरावलो होतोच. त्यामुळे पुढचा प्रवास सहजतेने झाला. एकदाचं मेलबोर्न आलं. 

लाडवाची ऍथ्रॅक्‍स पावडर !आधीच ठरल्याप्रमाणे प्रवरानगरचा जुना मित्र शंकर आहेर याच्या घरी जायचं होतं, मेलामेली (इमेल) झालेली असल्याने शंकरने सांगितले होते की, खायचे पदार्थ जवळ असतील तर रेडझोन मधून ये. स्वयंचलित पट्ट्यांवरून घरंगळत येणारे सामान सापडलं ते घेऊन रेडझोनमधून बाहेर पडलो, अनं काय दोन चार पोलिसांचा गराडा माझ्याभोवती पडला. त्यांनी बॅग उघडायला लावल्यावर एकेक करीत सगळं सामान त्यांनी बाहेर काढलं. शंकरसाठी आणि माझ्यासाठी खास करून दिलेले खाण्याचे पदार्थ जेव्हा त्यांच्या हाताला लागले तेव्हा जर धाकधूक झालं. पण त्यांनी त्यातलं काहीही न काढता पांढऱ्या पावडरची पिशवी बाहेर काढली. अंगावर खेकसून हे काय म्हणून विचारलं, बायको आणि आईने मेहनतीने केलेल्या रव्याच्या लाडवांचा झालेला तो चुरा होता हे कळायला मला वेळ लागला नाही. इंग्रजीत रव्याच्या लाडूला काय म्हणतात हे सांगता न आल्याने मी आपला धिस...धिस ईज... करत होतो. एकाने ही ऍथ्रॅक्‍सची पावडर आहे का? असं विचारल्यावर मात्र थोडा सावरलो, काहीही सांगायच्या भानगडीत न पडता काही कळायच्या आत पिशवी उघडली, लाडवाचा चुरा तोंडात गपकन्‌ टाकून खायला लागलो तसे तेही हसायला लागले. त्यांना मी स्वीट-स्वीट म्हणून प्रत्येकाच्या हातात बुचकुली - बुचकुली चुरा दिला. तोंड गोड झाल्यावर त्यांनीच माझी बॅग भरली आणि ते सर्व पोलिस सॉरी-सॉरी म्हणत टॅक्‍सीपर्यंत मला सोडवायला आले. 

टॅक्सीचालकाचे सौजन्य
रात्रीचे आठ वाजायला आल्याने भरमसाठ भूकही लागली होती. म्हटलं टॅक्‍सीत बसल्यावर काहीतरी खावं. २८, डेव्हीड स्ट्रीट, मेलबोर्न असा सरळसोट पत्ता सांगितल्यावर पुण्यातल्या रिक्षावाल्यांनी कानाखालीच मारली असती. पण हा बहाद्दर वर्णाने आफ्रिकन दिसत होता. त्याने मीटर चालू केले.थोडा वेळ गेला. रस्त्यावर शुकशुकाट असल्याने टॅक्‍सीत खायचा बेत रद्द केला. थोड्या वेळाने त्याने टॅक्‍सी रस्त्याच्या कडेला घेतली. माझी माफी मागून त्याने कोणाला तरी फोन लावला आणि या पत्त्यावर कसं जायचं? हे अगदी थोडक्‍यात विचारून घेतलं हे सर्व करत असताना तो मीटर बंद करायला विसरला नव्हता हे विशेष. आपल्याकडचा रिक्षावाला फिरव-फिरव फिरवून अर्धवट पत्ता घेऊन येता म्हणून आपल्याच नावाने ओरडला असता. मागे कधीतरी मद्रासला गेलो असता रात्री रिक्षावाल्याला ठराविक हॉटेलमध्ये सोडायला सांगितलं असताना तासभर फिरवल्यावर भरमसाठ बिल त्यानं घेतलं. 

दुसऱ्या दिवशी सकाळी बघतो तर काय? मी रिक्षात जेथे बसलो होतो ते रस्त्याच्या पलीकडं होतं. टॅक्‍सीत बसून पाऊण तास होऊन गेला होता. टॅक्‍सीवाल्याने मागे वळून तुम्ही इंडियातून आला का? असा प्रश्‍न केला. त्या काळ्याकभिन्न देहाच्या माणसाला हो म्हणावं की नाही? या धांदलीत पटकन हं म्हणून गेलो. त्याचा लगेच प्रश्‍न मुंबई की पूना? मी पुणे म्हणताच त्याची कळी खुलली. त्यांनी मला चक्क येरवडा का? तोपर्यंत मी स्थिरावलो असल्याने मैत्रीचा हात पुढे केला. टी.वाय.बी.कॉम.चे शिक्षण त्याने येरवड्यात राहून पूना कॉलेजमध्ये पूर्ण केलं होतं. पुढच्या पाऊण तासात आमची मैत्री झाली. याचा फायदा असा झाला की, डेव्हिड रस्त्यावर उतरल्यावर त्याने मला मदत केली. कारण अंधारलेल्या रात्री चिटपाखरूही रस्त्यावर नसताना गडकोट किल्ल्यासारखी बंदिस्त घरे. त्यामुळे दरवाजा कसा उघडायचा याचं काहीच भान नव्हतं. सॅम्सन नावाच्या त्या ड्रायव्हरने कोपऱ्यात भिंतीवर टांगलेल्या फोनवरून १४ नंबरला, शंकरला फोन केला. शंकरनी घरातूनच कळ दाबून त्या इमारतीचं ते भलं मोठं दार उघडलं. हे अर्थात मला नंतर कळलं. सॅम्सनचे आभार मानत शंकरच्या घरात एकदाचा घुसलो. रात्रीचे आठ जरी वाजलेले असले तरी मध्यरात्र उलटून गेली आहे! हे मला शंकरने सांगितल्यावर लहानपणी शिकलेल्या दक्षिण-पूर्व गोलार्धाची कल्पना आली. वहिनींनी खिचडी केल्यानंतर त्या वाफाळलेल्या खिचडीवर ताव मारताना प्रवासातल्या सगळ्या गंमती-जमती आठवत, त्यांना त्या सांगत दुसऱ्या दिवसाचे नियोजन करीत झोपी गेलो. आता कार्यशाळेतसकाळी आठला पोहोचायचे आहे, म्हटल्यावर त्याप्रमाणे नियोजन केलं. बाहेर येऊन पाहतो तो सूर्य डोक्‍यावर आला होता. शेरेटॉन हॉटेलमध्ये सेन्सर (संवेदन) या विषयावरची आमची कार्यशाळा सुरू झाली, ती तिथल्या "विज्ञान व तंत्रज्ञान' खात्याच्या मंत्र्याच्या भाषणाने. अस्खलित वैज्ञानिक भाषेत बोलणारा हा माणूस मंत्री आहे, हे सांगूनही पटणारं नव्हतं. उद्‌घाटन सोहळा म्हणजे त्याचं २५ मिनिटे (ठरवून) केलेलं भाषण, पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ, रांगोळ्या, बडेजाव, आरास, तेल, वात, समई, गडबड घोटाळा, आरडाओरडा असलं काहीच नाही.

प्लॅस्टिकचा कमी वापर
साध्या कागदाच्या पिशवीत आपल्याला पाहिजेत ते पेपर आपण घ्यायचे. हीच लोकं आपल्याकडे आली की, आपण याचं किती करतो नाही. फुकटात या कॉन्फरन्समध्ये काहीही नव्हतं. जिथे उद्‌घाटन होतं तिथे एक मोठ्ठं चित्र लावलं होतं. ज्यावर लाजाळूच्या झुडपावर चतूर दाखवला होता आणि सेन्सॉरच्या बाबतीत आपण निसर्गावर कधीही मात करू शकणार नाही या आशयाची ओळ. खरंच किती समर्पक! या सगळ्यात प्लॅस्टिकचा अत्यंत कमी वापर.

संशोधनाची योग्य दिशा
सुरवातीचं भाषण झाल्यावर त्या मोठ्या सभागृहाची तीन मोठ्या खोल्यांमध्ये विभागणी करण्यात आली आणि आम्ही गटागटाने पांगलो. तत्पूर्वी कॉफी घ्यावी म्हणून बाहेर आलो. सगळे ब्लॅक कॉफी पिताहेत पाहून मीही घेतली. जरा जास्तच कपात ओतली. प्यायलो.. अन काय.. अरेरे, एखादा पदार्थ किती कडवट असावा. कशीबशी रेचक दिल्याप्रमाणे ती प्यायलो. पाण्याचा लवलेशही नव्हता. छोटी बिस्किटं होती ती खाल्ली अनं जागेवर जाऊन बसलो.

या कॉन्फरन्सध्ये मला खरा रिसर्च कळला. संशोधन करायचे म्हणजे नेमके काय करायचे? हे कळले, माझे संशोधन योग्य दिशेने चालल्याची जाणीवसुद्धा झाली.

जेवणाची मारामार...!
दुपारच्या जेवणाच्या वेळी इतके पदार्थ.. पण तेल ,तिखट, मीठ, साखर न वापरता यांची जेवणं कशी होतात? हेच कळत नव्हतं. मनाचा हिय्या करून, स्पगॅटी शेंगुळ्या सारखं काहीतरी, खरंतर मोठ्या आकाराचे गांडूळच! कारण तोंडात घातलं, की ते इतकं गिळगिळीत की शिसारीच यावी, हॅमबर्गर असे अनेक मांसजन्य पदार्थ अर्थात मनाचा हिय्या करून खाऊन बघितलं की, लगेच विचारायचो, हे काय? की उत्तर डुक्कर (पोर्क), बिफ (बैल - म्हैस) बरं, शाकाहारी काय? तर नुसतं उकडलेला बटाटा, अंडे, कसला कसला (आपल्याकडील गाजर गवतासारखा) की जो चवीला अजिबात चांगला नव्हता. सॅलड म्हणून खायचा. एकंदरीत भोजन कसं असणार? याचा अंदाज बांधीत घरच्या ऍन्थ्रेक्‍स (रवा लाडू) ची व इतर पदार्थांची आठवण काढीत दिवस ढकलला. 

प्रत्येक गोष्ट व्यावसायिक
पहिला दिवस संपल्यावर दुसऱ्या दिवशी घरनंच (शंकरच्या) भरपेट खाऊन निघालो. टॅक्‍सीत बसलो. एक म्हातारी गाडी चालवीत होती. थोडं अचंबित झालो. कारण आता काहीही पचवायची ताकद आली होती. ती काही ऑस्ट्रेलियन वाटत नव्हती. इंडियासे क्‍या? असं विचारल्यावर मीच त्यांना आप कहॉंसे?विचारले. ती म्हटली "मैं पूनासे'. मग काय.. मराठीतच गप्पा. बाईंनी त्यांची दर्दभरी जीवनकहाणी ऐकविली. बाई बालविधवा, पळून आलेली जहाजातून. इथे एका पंजाबी माणसाशी सूत जुळवून संसार थाटलेला वगैरे. थोडा वेळ असल्याने म्हातारीने लताबाईंच्या आवाजातली गाणी लावली. सातासमुद्रापलीकडे लताबाईंचा आवाज ही केवढी जवळीकता. मजा वाटली. कॉन्फरन्समध्ये एक-एक दिवस जात होता. आपण भारतीय लोक संशोधन करतो म्हणजे कॉपी करतो. याची सातत्याने जाणीव होत होती. जगभरातले लोक असल्याने प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी,मांडणी वेगळी, चाचणी वेगळी. अर्थात त्यांची प्रत्येक गोष्ट व्यावसायिक. आपल्याकडे इंडस्ट्रीसाठी संशोधन हा धागा कुठेच नाही. आपण हुशार आहोत, सृजनता आहे. परंतु प्रत्येक संशोधनाचा उपयोग व्हायला हवा ही मानसिकता नाहीच. गाईड सांगेल ते किंवा सुचेल तसे काम करावयाचे ही प्रवृत्ती.

...आता परतीचा प्रवास
बॉकेटच्या दिवशी जरा कुचंबणा झाली. एका हॉटेलच्या उंच इमारतीवर आमची पार्टी चाललेली. आम्ही सर्व इंडियन्स एकत्र भारतीय म्हणून वावरत होतो. तेवढ्यात एका गलेलठ्ठ प्रचंड अवाढव्य देहाच्या बाईंची माझी कुणा भारतीयानं ओळख करून दिली. त्या उभ्याच होत्या कारण खुर्चीत तो देह मावत नव्हता. मी त्यांना "तुमच्या बरोबर फोटो काढायचा आहे' असं म्हटल्यावर त्या तत्काळ "हो' म्हणाल्या. मी कॅमेरा एकाकडे देत अंग चोरत त्यांच्याजवळ जाऊन उभा राहिलो. कॅमेरावाल्याने बाईंच्याजवळ सरका असे सांगितले. मी सरकायच्या आतच बाईंनी मला जवळ-जवळ ओढूनच चिकटून उभे केले. अफजलखानाने राजांना बगलेत घेतल्यासारखी माझी अवस्था झाली आणि फोटोग्राफरने तसाच फोटो मारला. असे करत-करत कॉन्फरन्स संपली. त्यानंतर मेलबोर्नचे जगप्रसिद्ध ब्रॅडमनचं स्टेडियम पाहता आले. महाराष्ट्र मंडळाला भेट देता आली. डॉलर फोबिया मलाही झाला होता. म्हणजे डॉलरमध्ये किंमत विचारल्यार ती रुपयात रूपांतरीत करून मनातल्या मनात बोलणे. कारण सामोसा पाच डॉलरला म्हणजेच दिडशे रुपयाला, तोही पंजाबी माणसाच्या हॉटेलमध्ये. घरच्यांसाठी खरेदी करून शंकर मंडळींना राम-राम करून विमानाने मुंबईला पोहोचलो. मुंबईच्या त्या बकाल आणि अस्वच्छ विमानतळावर एकदाचे पाऊल ठेवले. कसलीही तपासणी न होता बाहेर पडलो. टॅक्‍सी केली आणि बोर घाटामध्ये ट्रॅफिक - जाममध्ये अडकलो. जेवढा वेळ मेलबोर्न ते मुंबई विमानाला लागला त्याच्या दुप्पट वेळ मुंबई - पुणे प्रवासाला लागला. एवढे सारे होऊनही मी खुश होतो. कारण 'गड्या आपला गावंच बरा!'

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट