माझी गडगिरी भाग २२


*प्रतापगडाचा पारदर्शी शाळीग्राम*


           महाबळेश्वर_ पाचगणीला जायचे म्हणजे प्रतापगड  हे अत्यंत आवडीचे माझे ठिकाण. प्रतापगडावर तसा मी अनेकदा गेलो. कधी कुटुंबाबरोबर, कधी मित्रांबरोबर तर कधी सहलिंमधून मुलांबरोबर गड फिरून दाखवणे हा माझा आवडीचा भाग. पूर्वी अफजलखानाच्या कबरीपासून अर्थात शिवप्रतापाची अत्यंत उत्सुकता आणणारा, शिवरायांनी शामियानात खानाची भेट घेतली ती जागा.
          गड चढायला सुरुवात करण्यापूर्वी डाव्या बाजूची गुहा पाहणे गडाच्या पहिल्या पायरीचे दर्शन घेऊन गड चढायला सुरुवात करायची, आजही  उत्तमावस्थेत असलेला दरवाजा ते या गडाचे वैशिष्ट्य आहे.


    शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली परंपरा गडाचे दरवाजे सूर्योदयाला उघडतात व सूर्यास्तानंतर बंद होतात दरवाजाची आगळ आजही उत्तम अवस्थेत आहे. दरवाजातून आत आलं की ओवऱ्यावर तोफा ठेवलेल्या दिसतात. थोड्या पायर्‍या चढून झालं की माणूस संभ्रमात पडतो उजवीकडे जावं की डावीकडे. उजव्या बाजूचा भगवा झेंडा डोलाने फडकत असल्यामुळे आपली पाऊले आपसूक भगव्याकडे वळतात. चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकाचे कव्हर म्हणजे या चिलखती बुरुजाचे होय. सुस्थितीत असलेला बुरुज आजही गड प्रेमींच्या आकर्षणाचे ठिकाण आहे. सपसप पायऱ्या चढून गेलं आणि सूर्योदयाच्या सुमारास या माचीवर पोहोचल्यास जो नजारा दिसतो तो स्वर्गाला ही लाजवेल असा  दिसतो. शेवटी स्वर्ग म्हणजे काय हिरवाकच्च परिसर, सोनेरी सूर्याच्या कोवळ्या उन्हाची किरणे, तिनही बाजूच्या दऱ्यातुन येणारी शितल तर तरी  आणणारी हवा आणि डोक्यावर फडकणारा जरीपटका . या सूर्यकिरणांमुळे हे जावळीचं खोरं सोन्याहून पिवळे दिसायला लागतं. उभा आसमंत उजळून निघतो. थोडं ऊन वाढलं की पावलं उतरायचा कल घेतात आणि आपण चिलखती बुरुज उतरायला सुरुवात करतो. बुरुज उतरून आल्यानंतर पुन्हा एकदा भवानी मातेच्या मंदिराकडे आपली पावले वळतात.


        खरं तर आम्ही होळीच्या आदल्या दिवशी वासोट्याला जायचं म्हणून ठरवलं होतं परंतु बामनोलीला गेल्यानंतर तिथल्या वन अधिकाऱ्याने वासोट्याला जाण्यास मज्जाव केला. कारण महत्त्वाचे होते, लोक जंगलात होळीसाठी लाकडे आणायला जातात. उशीर झालेला असल्याने आम्ही बामनोलीलाच नदीपात्रातील बेटावर तंबूत मुक्काम केला.




पहाटे लवकर उठून आम्ही प्रतापगडाचा पायथा गाठला होता.
          भवानी मातेच्या मंदिराकडे जाण्यासाठी 50 ते 60 दगडी पायऱ्या चढून जावं लागतं ते गेल्यानंतर भवानीमातेच्या मंदिरात जाताना उजव्या बाजूला छोट्या उखळी तोफा ठेवलेल्या दिसतात. मंदिरात गाभाऱ्यात प्रवेश केला की सुरुवातीला सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची सांगितली जाणारी तलवार दिसते ज्याच्यावर सहा शिक्के आहेत. जे 600 सैनिक कापल्याची निशाणी दर्शवतात मंदिराच्या गाभाऱ्यात 2 तेजपुंज गोष्टी दिसतात एक म्हणजे भवानी मातेची अत्यंत देखणी डोळ्यात भरणारी गंडगी शिळेतील मूर्ती, भवानी मातेची ही सालंकृत मूर्ती छत्रपती शिवरायांनी नेपाळहुन गंडगी शिळा मागवून घडवून घेतली.
        दुसरी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि आऊसाहेब जिजाऊ यांच्या नित्य पूजेचे स्फटिकाचे शिवलिंग हे सुद्धा शिवाजी महाराजांनी स्वतः घडवून घेतलेले आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून हा सर्व नजारा पाहतात आमच्यातल्या एकाला भवानी मातेची आरती म्हणायची ऊर्मी आली आम्ही सगळ्यांनी चढ्या आवाजात दुर्गे दुर्घट भारी चा गजर केला.


          मंदिराच्या बाहेर येऊन मंदिराला प्रदक्षिणा घालण्यापूर्वी जुने चमडाहिन नगारे इतस्ततः पडलेले दिसतात. शेजारीच हस्त व्यवसायातील ना-ना विध वस्तूंचे दुकान आहे.
     या समोरच एक अत्यंत महत्वपूर्ण नकाशा लावलेला आहे. हा नकाशा म्हणजे अफझुलखान वधाच्या वेळी शिवरायांनी वापरलेली व्यवस्थापनशास्त्राची नीती. अर्थात शिवराय मॅनेजमेंट गुरु का म्हटले जातात याचा हा नकाशा म्हणजे उत्तम नमुना होय. येथून बाहेर पडून भवानी मातेच्या मंदिराला प्रदक्षिणा पूर्ण करून बाहेर आल्यानंतर बालेकिल्ल्याकडे आम्ही चालू लागलो. मध्य वाटेवर गेल्यावर समर्थ रामदास स्थापित नुमानाची मूर्ती आहे. तसेच पुढे दगडी पायर्‍यांनी गेल्यानंतर बालेकिल्ल्याचा दरवाजा ओलांडला केदारेश्वराचे मंदिर लागते. केदारेश्‍वराचे मंदिर म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण नंदी व आतल्या बाजूस भले मोठे शिवलिंग आहे. या मंदिराच्या शेजारी त्याच्या पलीकडे पडक्या अवस्थेत सदर नजरेस पडते. पलीकडे आऊसाहेबांचे वाड्याचे दर्शन होते. तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अत्यंत देखना भव्य अश्वारूढ शील्पकलेचा उत्तम नमुना असलेला पुतळा आहे. आजचा हा पुतळा जिथे आहे तिथे राजांचे यांचे राहण्याचे ठिकाण होय.
           किल्ल्यावर छोटे-मोठे बुरुज आहेत यशवंत बुरुज, सूर्य बुरूज, रेडका बुरुज इत्यादी, बालेकिल्ल्याच्या बाजूस दोन तळी आहेत या तळ्यापाशी आलो की किल्ल्याची फेरी पूर्ण होते. संपूर्ण किल्ल्याची तटबंदी आजही सुस्थितीत आहे पहाटे किंवा सायंकाळी या तटबंदीवरुन फिरणे हा सुखानुभव असतो. फिरताना पलीकडे आंबेनळीचा अर्थात रडतोंडीचा घाट, जावळीच खोरं बघायला मिळते.


         तळ्याजवळ परत आल्यानंतर उत्तम जेवण मिळते. पिठलं भाकर, खेकडा भजी, वांग्याचे भरीत, दही, ताक इ. तीन तास फिरल्यानंतर मराठमोळ्या गड्याला भोजनात आणखी काय हवं. गड उतरल्यानंतर लांब दूरवर अफझूलखानाची कबर दिसते. आता तिथे जाण्यास मज्जाव असला तरी मी पूर्वी 1989 साली तिथे भेट दिली होती. त्या काळात या कबरीचे दर्शन घेतल्यानंतर गुडघेदुखी बंद होते अशी वदंता  होती . प्रतापगड पाहताना वाईचा खानाचा डेरा, पसरणीचा घाट, खानाची ठरलेली भेट, शिवरायांनी घातलेले चिलखत, वाघनखे, बिचवा, खानाचा वकील, शाहीशामियाना आणि शिवरायांनी केलेला तो मर्दानी पराक्रम हे सर्व आठवत गड उतरलो. गाडीमध्ये बाबासाहेब देशमुख यांचा सुप्रसिद्ध पोवाडा ऐकत पाय उतार झालो. प्रतापगड उन्हाळ्यात हिवाळ्यात जसा बघावा तसाच धुवाधार पावसाळ्यात पावसाचे रौद्ररुप बघण्यासाठी बघावा असाच आहे.


 *शिवरायांचे आठवावे रूप !*
*शिवरायांचा आठवावा प्रताप !!*
*शिवरायांचे आठवावे साक्षेप!*
*भूमंडळी!!*

*ज्ञानसुत*
*संजय चाकणे*

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट