माझी गाडगिरी भाग 18

विषण्ण विशाळगड :

           आय कॉलेजचे नॅक नुकतेच संपले, आणि कुठेतरी गडावर जायचं अशी टूम निघाली, खूप वर्षात विशाळगडला गेलो नव्हतो, म्हणून विशाळगडला जायचे घाटले. बांधाबांध झाली आता पर्यंतपाच जण  तयार झाले. इंदापूर वरून निघून कोल्हापूरला पहिला मुक्काम आणि पन्हाळ्यावरून विशाळगडला रवाना झालो.

         आधी पावनखिंडीत जायचं की विशाळगडावर जायचं अशी आपपसात खलबतं झाले आणि आधी विशाळगड गाठायचा आणि मग पुन्हा पावनखिंडीत यायचं जमलं तर धबधब्यात तुडूंब आंघोळी करायच्या असा एक विचार झाला. आणि एकदाचं विशाळगडाकडे कूच केलं. विशाळगड नावाप्रमाणेच विशालकाय.



कातळ खडकाचा बनलेला हा गड. गडावर जायला एकमेव वाट गडाच्या मुख्य दरवाजाच्या समोरच मोठी खोल दरी अगदी नैसर्गिक छत्रपती शिवरायांच्या गडांना जसा खंदक असतो अशा पद्धतीची ही नैसर्गिक दरी. हिच ती वाट जिथून दोन नद्या एक उजवीकडे व डावीकडे उगम पावते उजवीकडची दरी कोकणात जाते तर डावीकडची कोल्हापूरकडे
दरीवर आणल्यानंतर ओलांडल्यानंतर आपण एका छोटेखानी खोबणीत या मंदिराकडे आकर्षिले जातो हे मंदिर म्हणजे देवीचा मुखवटा असलेले खोकलाई देवीचे मंदिर या देवीला नारळ वाहिला नाही तर खोकल्याचा त्रास होतो वा  विकार होतो अशी वदंता, त्यामुळे भाविक आपले बळी पडतात.









 असो पुढे गेल्यानंतर आपण सरळ दर्गा चौकात जातो हा दर्गा म्हणजे 'हजरत मलिक रिहान’  सुफी संतांचं अतिशय सुंदर स्थान.  भारतामध्ये अनेक ठिकाणी सुफी संतांचे जे दर्गा आहेत तिथे हिंदू आणि मुसलमान ऐक्याचं प्रतीक बघायला मिळतं. तेच विशाळगडावर ही बघायला मिळतं. इथे मुस्लिम बांधवांच्या बरोबरीने हिंदू भाविक मोठ्या प्रमाणात या दर्ग्याला येताना दिसतात. या दर्ग्यात वातावरण  स्वच्छ सुंदर व अप्रतिम बांधकाम आणि आता नवा साज चढवलेला विशेषता मीनाकाम अप्रतिम केलेले कुराणाचे काही आयते कोरून संगमरवरावर लिहिलेले त्यामुळे या भव्यतेत आणि धार्मिकतेत आणखी वाढ होते.

 दर्ग्याच्या बाहेरचा परिसर अत्यंत गलिच्छ. मुळात सगळीकडे कुर्बानीमुळे साचलेला एक उग्र दर्प आसमंतात फिरत राहतो.
       इथली प्रथा म्हणजे काही तासांसाठी इथे खोल्या भाड्याने मिळतात  तसेच गॅस, लाकडं, चुली, स्वयंपाकाची भांडी अगदी कंदुरी करण्यासाठी, किमान तंदुरी किंवा बिर्याणी करण्यासाठी लागणारे सर्व मसाले एकाच ठिकाणी मिळतात.
 आसमंत अत्यंत गलिच्छ . पंतप्रधानांचं स्वच्छता अभियान इथे नावालाही पोचलेलं नाही. सगळीकडे प्लास्टिक पसरलेलं, अत्यंत दुर्गंधी येत राहते, खरं सांगू का शिसारी येते, आमच्यातल्या एकाला तर अस्वस्थ वाटायला लागल्या मुळे तो गाडीत जाऊन बसू का ? असं सातत्याने म्हणत होता. अगदी बोळाबोळा चे रस्ते. आणि त्यामुळे गोंधळ दमट कुंद वातावरण आणखीनच विषण्ण होत राहते. विषण्णनतेमध्ये भर घालत राहतात दर्ग्याचे दर्शन घेऊन आल्यानंतर आपसूक पावले वळतात ती समाधीकडे  तोफेकडे अर्थात अमृतेश्वरकडे आणि मग शोधायला लागतो ही ठिकाणं ती सापडणं कठीण जाते कारण अगदी घरातन  गेल्यासारख्या परसातन चालत जावे लागते माणसं बरीचशी कानडी इथे येऊन राहतात आणि त्यामुळे त्यांना मराठी येत नाही पुरेशा पाट्या नसल्यामुळे कोणी काही सांगत नाही माहितीच नसते.

राजाराम महाराजांच्या तिसऱ्या पत्नीची समाधी गडावर आहे खरं सांगू का जाण्याचे धाडस सुद्धा होत नाही कारण रस्ता अत्यंत गलिच्छ, घाणेरडा. बाजीप्रभू देशपांडे यांचे भाऊ फुलाची देशपांडे यांची ही समाधी आहे तीची तर आणखीनच अवस्था वाईट मुंढा दरवाज्याकडे गेल्यानंतर तिथे मात्र थोडं सुखावह वाटतं सुस्थितीत असलेला नव्याने बांधकाम केलेला हा दरवाजा राजा भोज याच्या काळाची आठवण करून देतो, शेजारीच एका उंचवट्यावर तोफ ठेवलेली आहे तोफेचा निशाणा अर्थातच मुख्य दरवाजाच्या पलीकडे दिसतो तशा गडावर एकूण दोन तोफा आहेत एक अर्धवट पिचलेली दोन माणसांना उचलता येईल अशा वजनाची अमृतेश्वर मंदिरात आहे. या दरवाजापासून नंतर पुन्हा आम्ही पंतांच्या वाड्याकडे गेलो पंतप्रतिनिधींच्या हा वाडा हा वास्तु शिल्पाचा उत्कृष्ट नमूना त्याकाळात असावा दोन विहिरी बारववजा दिसतात एक विहीर उंचावर तर दुसरी थोडीशी खाली पहिल्या विहिरीतलं पाणी जास्त झाल्यानंतर दुसऱ्या विहिरीत जाण्याची सोय आहे, दोन्ही विहिरींमध्ये वाड्यातून जाता येत वाड्याच्या मुख्य दरवाजातून डावीकडे आत गेले की, एका बाजुला खाली उतरण्यासाठी पायऱ्या आहेत अख्खा सोपान उतरून गेले की शुद्ध निळेशार थंडगार पाणी आपल्याला एक वेगळी शीतलता देते वाड्यांमध्ये जागोजागी नहर वा नाली दिसतात या कदाचित स्नानगृहातून पाणी बाहेर पडण्यासाठी केलेल्या असाव्यात. वाड्याच्या तीन ते चार फुटी  भिंती हे या वास्तूचे वैशिष्ट्य सदर, दरबार, राहण्याच्या खोल्या मुदपाकखाण्याची खोलीस्नानगृह सहजी ओळखता येतात.
राजा भूजाच्या काळातील शंकराच्या मंदीरात गेल्यानंतर मंदीरात आम्ही प्रवेशित झालो. अणि गर्भ गृहात गेलो. गर्भ गृहात श्ंकर पिंड अत्यंत 🎂सुबक, गुळगुळीत केलेली शाळुंका, दक्षिण वाहिनी गंगा , मागच्या बाजूला शंकर पार्वतीची आकाश मार्गे गमन करणारी अत्यंत सुबक मूर्ती. बाहेरच्या बाजूला गर्भगृहाच्या बाहेर नंदीशेजारीच पूर्वेस तोंड करुन ब्रम्हाची मूर्ती ठेवलेली आहे. ही मूर्ती दुसऱ्या
 कुठल्यातरी मंदीरातुन आणून ठेवल्याचा कयास आहे. मूर्ती अत्यंत देखणी सुबक बांधणीची गंडगी शिळेतली असावी असे दिसते. कोनाडयात शेजारीच गणपतीची मूर्ती आहे. वास्तविक दगडी असलेली मूर्ती रंग दिल्याने झाकोळून गेलेली आहे. कोकणातल्या एकंदरीतच मूर्ती उभट आकाराच्या आसतात. पुणे परिसरातील गणेशाच्या मूर्ती माञ बसकया हो मात्र  उभट, लंबसोंड, एकदंत्ती अशीच आहे.
या मंदिरच्या शेजारीच आणखी एक मंदीर असून, त्यामध्ये अनेक मूर्ती ठेवलेल्या आहे. ही मंदीर विष्णू मंदीर असाव असं कयास आहे.   गर्भ विष्णू पिंडीवर"जे चौकोनी आकाराचे आहे" त्यावर विठठल, मारुती , गणपती अशा केवळ संरक्षणार्थ ठेवलेल्या दिसतात. गर्भग्रहाच्या बाहेर माञ  स्थित प्रज्ञ गरुुुडाड मूर्ती आहे. येथून मागच्या बाजूला एक जूनी अर्धवट तुटलेली तोफ असून दोन माणसांना ती सहज उचलता येते.
हे सर्व करुन आम्ही खाली उतरलो आणि पावन खिंडीकडे रवाना झालो. पावन खिंडीचा प्रवास पुढच्या भागात. आपले गडकिल्ले विषण्ण होत चाललेले दिसताना अक्षम्य दर्लक्षामुळे असे होय.
आपण याकडे कमालीचे लक्ष दिले पाहिजे. छञपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या हे गडकोट आपणच जपायला हवे.
त्याचे पाविञ राखूया.
संजय चाकणे
ज्ञानसूत

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट