*माझी गडगीरी भाग – १*

 शुरांचा गड सिंहगड -  

            सिंहगडवर तसा मी अनेकदा गेलो. राष्ट्रीय छात्र सेनेत असताना अंबुशसाठी ८ दिवस गडावर मुक्काम केला. खेड शिवापूरवरुन येऊन पोटॅटो पॉईंट पासून आम्ही गड चढला होता. कात्रज ते सिंहगड  असा सात टेकड्यांचा ट्रेक, कल्याण दरवाजापासून मणेरवाडीतून अर्थातच घोरपडीच्या वाटेवरुन पुण्याकडुन अर्थात डोणजावरुन, तसेच खेड शिवापूरवरुन असा सगळ्या वाटांनी सिंहगड चढुन झाला आहे. पण सिंहगड लक्षात राहिलला तो म्हणजे एकदा शनी आमावास्येला पुरुषोत्तम आवदे आणि मी सायकलवरुन डबलसिट कोथरुड वरुन सायंकाळी ५ ला निघालो. तसा हा आमचा बऱ्यापैकी नित्याचा उपक्रम होता. सायकलवर डबलशीट उधळत यायचं, दोघांनी पँडल मारायचे, डोणजाला सायकल लाऊन कमीत कमी वेळात गड चढुन नरवीर तानजीचे दर्शन घेऊन देव टाक्याचे पाणी पिऊन परत यायचे. पण यावेळी मात्र *शनी आमावस्येला गड सर करायचा अस भूत दोघांच्या डोक्यात घुसल होतं* मग कायं डोणज्याच्या पायथ्याला सायकल झाडाला लावली. साधारणत: ८ च्या सुमारास गड चढायला सुरुवात केली. 
          निम्या गडावर गेल्यानंतर एक पांढरी आकृती जंगलातून आमच्याकडे यायला लागली. एकतर शनिवार त्यात आमावस्या, काळोखभिन्न अंधार आधाराला टिपूर चांदणं आणि ही आकृती आमच्याकडे हळू-हळू यायला लागली. डोक्यातलं भूत त्या आकृतीत दिसायला लागलं आणि भितीची गाळण उडाली, पाय लटपटायला लागले, आम्ही दोघांनी एकमेकांचे हात नकळत घट्ट धरले तेवढ्यात ती आकृती टुणुकन उडी मारुन धबाक्कण दत्त म्हणून उभी ठाकली. एवढ्या थंडीत आम्ही दोघे घामानी निथळत होतो. श्वास जोरजोरात सुरु झाला होता. काही कळायच्या आत त्यांनी काठी आमच्या समोर आपटली. खरंतर मी त्यांच्या पायाकडे बघण्याचा प्रयत्न करीत होतो पण पाय दिसत नव्हते. नाना शंका कुशंकाने मेंदू बधीर झाला होता. छातीचे ठोके धाड-धाड करीत होते. हे १००% भूत असणार याची खात्री पटली होती. मी ११ वी सायन्सला होतो, वय हुड होतं (भूत नसतं हे एस. वाय. बीएस्सी. ला गेल्यावर कळलं होतं कारण आम्ही घाणेकरांबरोबर भूत बघायला भिमाशंकरला गेलो होतो, हा किस्सा पुन्हा कधीतरी काठी आपटुन दरडावणीच्या सुरात त्यांनी विचारले, ये… कुठं चालला…! एका क्षणात आम्ही जागेवर आलो त्यांनी सांगितलं येथे खुन झालाय तुम्ही वर जायचं नाही मग काय? आणखीनच त्रेधातिरपीट उडाली. त्या व्यक्तिने शांतपणे सांगितले मी पोलीस आहे. "एका मुलीचा येथे खून झाला आहे" आम्ही सावरत होतो त्याने प्रेताकडे नेलं, एका मुलीचा कुऱ्हाडीने गळा कापला होता. कुऱ्हाड तशीच मानेत रुतलेली होती, आणि काळजाचा थरकाप उडवणारे ते चित्र विचारांच्या चिंध्या चिरत-चिरत गेल. आतापावेतो आम्ही बरेच सावरलो होतो, तेवढ्यात पुर्षाने त्यांना विचारले आम्हाला गडावर जायचंय! कसाबसा जीव मुठीत धरुन गड सर केला.           
          वीरश्री तानाजींचे दर्शन घेऊन पागेमध्ये मुक्कामाला गेलो. दरवेळेच्या शीरस्त्याप्रमाणे लाकडं गोळा करुन खिचडी तयार करायला घेतली, हे सगळं करता-करता मध्य रात्र उलटून गेली होती. कितीही झोपेचं सोंग घेतलं, तरी झोप येत नव्हती. दोघेही कायबाय बरळत होतो, शेवटी पुन्हा एकदा रात्रीचचं तानाजी कड्यावर जायचं ठरलं. घोंगावता झोंबरा वारा अंगावर येत होता. पहाटे पर्यंत गाणी म्हणत, बेंबीच्या देठापासून पोवाडे गात ,शिवचरित्रातील काही भाग, सरदार मालुसरेंचा तसेच,सरदार बलकवडेंचा इतिहास एकमेकांना सांगत कड्यावर शेकोटीत म्हाताऱ्या जाळत रात्र जागवली. सकाळी सुर्योदयासाठी ॲन्टेना पाँईट जवळ आलो त्याच्याआधी उदयभानाची समाधी, कल्याण दरवाजा, टिळक बंगला, कोंढाणेश्वराचे दर्शन तसेच छत्रपती राजारामाचे दर्शन घेऊन प्रहार कड्यावर येऊन बसलो. 
          पुर्वेकडचा सर्व आसमंत रक्ताळला होता रवीसुद्धा झाकोळला होता,  ढगांच्या आकृतीतसुद्धा कुऱ्हाडीसह  प्रेत दिसत होतं. खिन्न मनानी गड उतरायला सुरुवात केली. आतामात्र रविवार असल्याने गडावर  वर्दळ सुरु झाली होती. त्या जागेवर आल्यानंतर तेथे पोलिस, मुलीचे नातेवाईक आणि इतर बघे यांची गर्दी जमली होती. त्या गर्दीत जाण्याचे धाडस झाले नाही, आणि न बोलता आम्ही मुकपणे सायकलवर परत आलो. येताना खडकवासल्याच्या धरणात अंघोळी केल्या आणि परत कोथरुडच्या गणेश कॉलनीत आलो. सिंहगड मी खूपदा केलेला होता तरीसुद्धा ही गडगिरी कायम आठवणीत राहिली. छत्रपतींचा इतिहास जागवायचा / अनुभवायचा असेल तर गडगिरी केली पाहिजे. छत्रपतींच्या पावलांची धुळ माथी लावली पाहिजे. चला वर्षातून किमान दोनदा कुठल्यातरी  गडावर जाऊया.
                                 गडप्रेमी,

                                                                                                                                               संजय चाकणे                                                                                                                                                                          ज्ञानसुत

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट