*माझी गडगिरी भाग :- ११*
*भिमाशंकरची भुतं:-*

भिमाशंकर म्हणजे भिमा नदीचे उगमस्थान. वास्तविक हा महादेवाचा डोंगर म्हणून प्रसिध्द. बारा ज्योतिर्लिंगापैकी प्रसिध्द असलेले ठिकाण. त्यामुळे कायम गजबजलेले. *शिवपुराणातील* २० व्या अध्यायात ०१ ते २० श्लोकामध्ये या ज्योतिलिंगाची महती वर्णीली आहे  २१ व्या  अध्यायात श्लोक ०१ ते ५४ मध्ये माहिती आहे. त्याचप्रमाणे *भिमा पुराणात* याच्या पहिल्या ०३ अध्यायात भिमाशंकरचा उल्लेख येतो. एकदा आम्हा मित्रांनी डॉ प्र.के. घाणेकर सरांचे भाषण ऐकले होते. आणि त्यात भिमाशंकरला भुते बघायला मिळतात असे त्यांनी सांगितल्याने १९८७ साली आम्ही भिमाशंकरला भुतं बघायला गेलो. भिमाशंकरला जायला तशा अनेक वाटा त्यातील महत्वाच्या ०२ वाटा एक म्हणजे राजगुरुनगर व वरून भोरगिरी किल्ल्यापासून वर जाता येते, किंवा मंचर वरुन  घोडेगांव मार्गे जाता येते.
डॉ. प्र. के. घाणेकर यांच्या कडून एकदा भिमाशंकरच्या भुतांबद्दल ऐकलं होतं. तेच मनात ठेऊन आम्ही १० – १२ जणांनी भिमाशंकरला जाण्याचं ठाण मांडलं. शिवाजीनगर वरुन दुपारच्या एस.टी. ने डिंभे धरणाचा रम्य परिसर न्याहाळत भिमाशंकर गाठले. वन विभागाच्या अतिथीगृहात आमची राहण्याची सोय आम्ही आधिच केलेली होती. वास्तविक भिमाशंकरला लोक महाराष्ट्राचा मानचिन्ह असणारा प्राणी शेकरु ( 2 फुट लांबीची खारुताई) बघायला जातात. पण आम्ही मात्र भुतं बघायला गेलो होतो. भिमाशंकरला जायला जंगलाच्या वाटा अनेक एक भोरगिरीची दुसरी कोकणदऱ्याची तर तिसरी महादेव कोळी वसतिकडे जाणारी डोंगरातली अत्यंत दुर्मिळ आणि दाट जंगल असणाऱ्या या वाटेने जायचं ठरवलं. आत भुतं बघायची म्हटल्यानंतर ती फक्त रात्रीच बघता येतात त्यात श्रावणातला महिना त्यामुळे चिंब वातावरण उघड झाप करणारा उन्हा पावसाचा दिवसभराचा खेळ त्यामुळे रात्रीचा झोंबणारा गार वारा, मृदगंध व पानांची होणारी सळसळ, मध्येच एखाद्या प्राण्याच्या आवाजानं भयानकता वाढवणारी रात्र. डोळयात बोट घातलं तरी कळणार नाही इतका काळोख भिन्न् अंधार. त्यात आमची चाललेली वरात. खर तर मृतात्मे बघायला अति उत्साहाने पुण्यातून निघालो होतो व एकमेकांचे हात घट्ट पकडून पुढे – पुढे चाललो होतो. तेवढयात एक जण बोंबलला ते बघ त्या झाडावर काही तरी लटकतय वास्तविक भुत बघायला मिळणार नाही असा कयास होता परंतु लटकतंय म्हटल्यावर आम्ही लटपटायला लागलो. आणि आम्ही ०७ जण होतो इतके जवळ आलो कुणी कुणाचा हात घट्ट पकडत होतं. कुणी कमरेला तिढा मारत होतं, एकाने माझ्या दंडाला धरले होते तर दंडाला त्याची बोटे रुतली होती. हे सगळं घडत असताना बघतोय तर एक आकृती चमकत होती. म्हणतात ना भुताचे पाय उलटे असतात म्हणून आम्ही पाय बघत होतो. हळुहळु समजायला लागलं की, ही आकृती आकार बदलती आहे. मधुनच घोडयाचा कधी सापाचा तर कधी डोकं नसलेला प्राणी, पक्षी असे नानाविध आकार बदलत होते. हळुहळु अशा अनेक आकृत्या त्या भागातील सगळयाच झाडांवर दिसायला लागल्या. एव्हाना आम्ही सावरलो होतो. सर्व आसमंत अंधुकशा हिरवट पोपटी रंगाने चमकत होतं. आम्ही हळुहळु एका झाडाकडे निघालो व अगदी जवळ गेल्यावर तिथे चमकणारी एक रेषा दिसली खरवडून काढली आणि लक्षात आलं हे वेगळचं काही तरी आहे. थोडक्यात काय तर ही भुतं नव्हतीच तर भिमाशंकर मधील या झाडावर बुरशी वाढते पाऊस पडून गेल्यावर पावसाचा शिडकावा संपल्यानंतर गार वारं सुटलं की ल्युमिनीफेरस मटेरियलच ऑक्सीडेशन होत व जैव रासायनिक प्रक्रियेमधून उजेड बाहेर पडतो. हा उजेड किडयांना आकर्षित करण्यासाठी असतो. जसा काजव्याच्या शेपटीतून उजेड बाहेर पडतो तशाच प्रकारचा हा उजेड होय. जंगल तोडीमुळे आता या बुरशीचे प्रमाण लोप पावत चाललं आहे. मानवांना कळायचंच नाही चमकणाऱ्या झाडांच्या फाद्यांनाच भुतं म्हणायचा शिरस्ता पडला असावा. त्यामुळेच नानाविध भुतांची प्रारुपे बाहेर आली असावीत. पिंपळाच्या झाडातून घुंगराचा आवाज येतो ही संकल्पना जशी बदलली तसंच काही भुतं ही संकल्पना मनातुन नष्ट झाली. जैव विविधतेच्या साखळीमध्ये प्रत्येक घटकाला जगण्याचा अधिकार आहे तोच अधिकार या बुरशीला आहे. म्हणूनच जंगलातील ही भटकंती करुयात पण जैव विविधतेला कुठेही बाधा येणार नाही याची काळजी घेऊया.
*चला तर गड वाचवुयात तिर्थस्थानांचे पर्यटन करुया व झाडे जगवुयात*
*डॉ. संजय चाकणे*
*ज्ञानसुत*


या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट