माझी गडगिरी भाग १९

 पवित्र पावनखिंड :  हिरव कच्च जंगल 


                 उन्हाळ्याचे दिवस, विशाळ गडावरून पावनखिंडीकडे जाताना हिरव कच्च जंगल नजरेस पडतं, भर उन्हात गार शीतलता, थंडावा देत. लहानपणापासून पावनखिंडीचे आकर्षण राहिलेल. चौथीच्या पुस्तकातील ते चित्र कायम कोरुन राहिलेलं. मागे विशाळ गडावर तोफांचे बार - खिंडीत बाजी प्रभू मावळ्यांच्या  मांडीवर पडून तोफेच्या आवाजाकडे कान देऊन आहेत. हे व मोगलांना अडवणारे पाच-पन्नास मावळे उंच कातळ, प्रपाताचा परिसर हे दुसरे चित्र- तसेच भालजी पेंढारकरांचा तो गाजलेला चित्रपट डोळ्यासमोरून हळूहळू पुढे सरकत होता.
      शहापूरहून विशाळगड व परत पावन खिंडीकडे जाताना अनेक ठिकाणी पलाश वृक्ष अर्थात पळस फूललेला दिसतो. इंग्रजीत याला खूप सार्थक नाव आहे "जंगलफायर"जंगलात आग लागल्या सारखी दिसते नारंगी रंगाची पोपटाच्या


आकाराची ही फुले सहजी लक्ष वेधतात. या भागात पळसाची खूप झाडे आहेत, त्यामुळे सह्याद्रीची उपरांग जागोजागी पेटल्या सारखी दिसते. पुढे पुढे जाताना अतिशय मऊ- मुलायम अशी शाल्मलीची झाडे दिसतात. ही वास्तविक काटेसावर, शिवरी च्या जातीची, गुलाबी रंगाची फुले याला येतात. याला होळीची फुले सुद्धा म्हणतात.


     अनेक ठिकाणी ही फुले पाण्यात भिजत घालून त्यापासून अतिशय पक्का रंग तयार करतात जो रंगपंचमीला लोक वापरतात आज-काल याला नैसर्गिक रंगाची मान्यता मिळाली आहे.

      खऱ्या अर्थाने नैसर्गिक संपत्ती या भागात पाहायला मिळते, नानाविध प्रकारची झाडे, त्यावर आकाशाला गवसणी घालणाऱ्या वेली, नशीबवान असाल तर एखादा रानगवा बघायला मिळतो.
       पावनखिंड इकडे थोडासा घाट चढून जावे लागते. अत्यंत सुबक धाटणीचा एक बुरूज  स्मरणार्थ बांधला आहे. पावनखिंडीत अदमासे ३५० पायर्‍या उतरून जावे लागते. पायऱ्या उतरून गेल्यावर बाजीप्रभु ची समाधी दर्शन घेऊन साखळदंड मार्गाने उतरायला सुरूवात केली की वाऱ्याची झुळूक अंगावर येते.
      वास्तविक इथे हे "धबाबा तोय आदळे" ची अनुभती येत राहते. सध्या धबधबा बंद आहे पण तरी एक छोटासा झरा वाहत राहतो. पाणी इतकं पारदर्शी, नितळ कि आपण आपोआप ते पिण्यासाठी वाकतो.




      खिंड नक्की कुठे किंवा विरश्री बाजीप्रभू नक्की कुठे उभे होते.  छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी भोयांनी नक्की कुठून नेली असेल पन्हाळ्याची दिशा कुठली, विशाळगड कुठल्या बाजूला असा सगळा खल होत असताना आम्ही जवळजवळ १ की. मी. खिंडीत पुढे चालत गेलो होतो 50 ते 60 फुटांच्या दगडी भिंती उभ्या खऱ्या अर्थाने खिंडीचा अनुभव घेत पुन्हा माथ्यावर आलो . विन्मुख होऊन १० - १५ मिनीटे एक जगी बसलो .
जुन जुलै मध्ये तरुण पोरांबरोबर इथे यायचेच हा निर्धार करुन थंडगार ताक घेऊन परतीकडे निघालो .


ज्ञानसुत
संजय चाकणे 



या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट