माझी गडगिरी भाग :- 15

*हिरवा–पिवळा–लाल मल्हार गड*

लहाणपणापासून जेजुरीला जाण्याचा अनेकदा प्रसंग आला, विशेषत : घरातील कोणाचेही लग्न झाले की आमची स्वारी नवरानवरी बरोबर हमखास असायची . गावातल्या नगाऱ्याला चामडं बसवायला बैलगाडीतून प्रवास केला होता .
      2005 साली आम्ही पुणे – सासवड – निरा – फलटण रस्त्यावरील दौंडज या गावात सलग समपातळी चराची 10 दिवसांची साखळी पध्दतीने राष्ट्रीय सेवा योजनेची अनेक शिबिरे घेण्यात आली होती. या शिबिरातून दौंडजच्या पिण्याचा प्रश्न काळाच्या ओघात सुटला. तिथे चार महिने येणारे पाण्याचे टँकर बंद झाले. ही शिबिरे चालु असतांना सातत्याने जेजुरीवरुन दौंडजला जावे लागत होते. त्यामुळे दोन – तिन वेळा जेजुरीला गडावर जाणं झालं डॉ. राजकुमार रिकामे, प्राचार्या अर्चना ढेकणे बरोबर असायचे.
एकदा भर दुपारी गड चढत असतांना चर्चा चालु होती की, गडावर झाडं लावणं फारच गरजेचे आहे. जेजुरीचा गड म्हणजे सोनेरी गड – नवलाख पायरीचा गड – देवी म्हाळसा बानुबाईचा गड, राजे शहाजी व छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक भेट जिथे झाली व ज्या पितळी कासवामध्ये एकमेकांचे चेहरे पाहिले तो मार्तंड गड, ज्या पेशव्यांनी पंचधातूचे पंचानन दिले तो जेजुरी गड, सरदार पानसेंची 65 किलोची तलवार अर्थात खंडा आहे तो जयाद्री गड, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती जिथे आहे तो बहुजनांचा गड,
या सर्व पार्श्वभूमीवर जेजुरीच्या गडावर वृक्षारोपण करायचे ठरवले. अर्थातच हिरवा, पिवळा जेजुरी गड करायचा असं आम्ही ठरवलं. हिरवा पिवळा गड म्हणजे काय तर, हिरव्या कच्च पानांची आणि पिवळया फुलांची जास्तीत जास्त झाडं लावायची.  त्याप्रमाणे 05 दिवसांच राज्यस्तरिय शिबिर हे जेजुरी गडाच्या पायथ्याशी शरदचंद्रजी पवार महाविद्यालयाने घेतलं. अशी लागोपाठ 03 शिबिरे झाली. राज्यभरातून आलेल्या मुलांनी सलग समपातळी चराचे प्रात्यक्षिक स्वत: कै. वसंत टाकळकर यांनी मुलांना दिलं होतं, आणि त्यातुनच मग वरंभ्यावर ही झाडं लावण्यात आली. ही झाडं म्हणजे काय तर पिवळी कन्हेर अर्थात बिटटयांची झाडं किंवा ऐलो बेल पिवळया फुलांची झाडं काशिद अर्थात कॅशिया अशी ना-ना विध झाडं लावण्यात आली. आम्ही झाडांचं रोपण करीत असताना हिरवा, पिवळा जेजुरी गड असं म्हणत होतो.
एक दिवस एक  आजोबा तिथे आले आणि म्हणाले हिरवा, पिवळाच का लाल का नको आणि मग त्यांनी आम्हाला हिरवा, पिवळा, लाल गड असं त्यांच नामकरण करायला सांगितलं. पुढच्या शिबिरात आम्ही तशा प्रकारचं नामकरण केलं. आणि गुलमोहरांच्या झाडांची  मोठया प्रमाणात लागवड केली.
या शिबिराच्या एका उदघाटन प्रसंगी डॉ. नरेंद्र जाधव तत्कालीन कुलगुरु आले होते त्यांनी या उपक्रमाचं प्रचंड कौतुक केलं. त्यांनी एक कल्पना मांडली ती म्हणजे जिथे जिथे देवस्थानं गडांवर आहेत किंवा टेकडीवर किंवा उंचवटयावर आहेत त्या त्या ठिकाणी आपण वृक्षारोपण करायचं. आज जेव्हा जेजुरीवरुन जाणं होतं त्यावेळी असं लक्षात येतं की, आपण लावलेल्या या झाडांना आता फुलवा चांगला फुललेला आहे. अर्थात झाडं हिरवी तर आहेतचं पण पिवळया फुलांनी हा सगळा परिसर नटलेला दिसतो. मोठया प्रमाणात गुलमोहर लावल्यानंतर अर्थात आम्ही जेव्हा झाडं लावत होतो तेव्हा गावकऱ्यांनी विशेष: देवस्थाननी मोठया प्रमाणात येथे वृक्षारोपण करण्यासाठी हाती घेतलं. नुसतं केलं नाही तर त्या वेळच्या जेजुरी गडाच्या देवस्थानच्या  सदस्यांनी येथे ठिबक सिंचन अर्थात पाण्याची व्यवस्था केली त्यामुळेच आता ही झाडे जगलेली दिसतात.
जेजुरी म्हटलं की, चंपाषष्टी किंवा चैत्रातलं नवरात्र किंवा दर रविवारी होणारी यात्रा किंवा सोमवती आमावस्येला होणारी मोठी यात्रा या यात्रा काळामध्ये लाखो भाविक या गडाला भेट देतात. नुसती भेट देत नाहीत तर वरती जाऊन भंडारा उधळणं आणि दर्शन घेणं शिवरात्रीच्या दिवशी गुप्तलिंगाच दर्शन असं विविध प्रकार यात आढळतात खरं तर सामाजिक, सांस्कृतिक, ठेवणीचं ठिकाण, अनेकांच कुलदैवत लग्ल झाल्यानंतर पहिली भेट या देवस्थानला दिली जाते. वास्तविक हे देवस्थान कष्टकऱ्यांच, श्रमजिवीकांच बहुजनांच देवस्थान हे कदाचित श्रीमंत नसेलही.
पण येथे येणारा भाविक वर्ग चिंचेच्या बनामधला, होळकर वाडयातला, अहिल्यादेवी होळकर यांच्या तलावामध्ये आंघोळ करणारा, जुन्या गडावर जाणारा विशेष: आता जय मल्हार ही सिरीयल येऊन गेल्यानंतर भाविकांचा ओघ नकळत वाढला आहे. त्याचप्रमाणात येथे सोयिंची कमतरता जाणवते आहे. विशेषत: नगरपालिकेने करावयाची स्वच्छता स्वच्छता गृहांची कमतरता, जाण्या येण्याची अनेकांना होणारा त्रास, विशेषत: वृध्द लोकांना एवढया पायऱ्या चढणे होत नाही. मागच्या बाजुने कार इथपर्यंत जायला हवी किंवा एखादी गाडी वर जायला हवी. अशी सोय करणं अगत्याचं वाटतं. नव्या गडापासून जुन्या गडापर्यंत पायवाट तशी अवघड आहे. परंतु भाविक म्हणून लोकांना जाता येता यावं जुन्या गडावर  देवस्थानचं मुळ स्थान हे जुन्या गडावर आहे असं मानलं जातं. आणि मग येथून रोपवे टाकता येईल का . इथपर्यत जाणं लोकांना सहज सुलभ होईल का, अशा प्रकारच्या सोयी करता येतील. केवळ झगमगाट करुन देवस्थानं चांगली होणार नाहीत तर तेथे असलेल्या राहण्याच्या उत्तम सोयी, वाघ्यामुरुळींचा इथला जो काही साज आहे तो टिकवायचा असेल तर त्यांच्यासाठी कराव्या लागणाऱ्या सोयी विशेषत: मुरुळयांच्या बाबतीत येथे अत्यंत अनास्था आहे. अनेक अंधश्रध्दा सुध्दा पसरलेल्या आहेत. त्या सगळया दुर करुन समाजामध्ये एकरुपता आणून या गडाचं महात्म टिकवणे हे खरं तर काळाच्या ओघात आपल्याला बघावं लागेल. गडांवरची देवस्थानं जशी आपल्याला टिकवायची आहेत तसचं गडाचं अस्तित्व सुध्दा अबाधित राहण्यासाठी सर्वजण प्रयत्न करुयात चला तर गडांवरील देवस्थानांना भेटी देऊयात.
गडप्रेमी,
ज्ञानसुत
डॉ. संजय चाकणे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट