*लहानपणचा दिवाळसण*

लहाणपणचा दिवाळसण

लहानपणी दिवाळीच्या सुट्टीमध्ये मामाच्या गावाला किंवा आमच्या मूळच्या गावी चांडगावला  जाताना कोण आनंद असायचा. दिवाळीच्या आधी तीन-चार दिवस जळगाव वरून महाराष्ट्र एक्सप्रेस ने श्रीगोंदा स्टेशनला उतरायचं. तो रात्री आणि दिवसभराचा प्रवास, श्रीगोंदा स्टेशनला मामा घ्यायला येई, किंवा आजोबा ज्यांना आम्ही अण्णा म्हणायचो ते बैलगाडीने यायचे आणि बैलगाडीने बाबुर्डी ला अर्थात बोरुडे वाडीला वाडीला जायचं,
दिवाळीची सुरुवात मोठ्या दिमाखात व्हायची सर्व सात  मावश्या त्यांची मुलं, आजी आजोबा मामा मामी असा मोठा गोतावळा तयार व्हायचा, तसंच काहीसं चांडगाव ला व्हयचं मोठे चुलते आम्ही ज्याना दादा म्हणायचो, अण्णा, आप्पा, त्यांची मुलं सगळी चुलत भावंडे सगळा मेळ जमायचा.

वसुबारसेला मामांच्या अर्थात आजोबांच्या घरी धमाल असायची. त्यांच्या त्या काळ्या करड्या पांड्या पांढऱ्या कृष्णधवल अशा गावरान गाई. मेंढ्या. शेळ्या मोठा बारदाना होता. हे सगळं वसुबारसेला खूप मजा करण्यासाठी असायचं. अण्णा मोठ्या आवाजात अर्थात खरडया पट्ट्यात खालील गाणे म्हणायचे आम्ही त्यांच्या मागे सर्व नातवंड लयीत गायचो
🐂🐃🐂🐃🐂🐃

दिन दिन दिवळी
गायीम्हशी ववाळी
गायीपाशी चौरं
बैल नवरं
बैल कुणाचं
किशन देवाचं
किशन देवाला
गुुण गुण डोळं
आम्हाला सव्वा डोळं
आंबिकेच ऊदं ऊदं
भैरूबाचं चांगभलं
खंडोबाच्या नावानं चांगभले
गाय येलीे मोरी गेनुबा
गाय येली मोरी
मोरीला झालाय गो-हा गेनुबा
मोरीला झालाय गो-हा
गो-ह्याच्या गळ्यात गेठा गेनुबा
गो-ह्याच्या गळ्यात गेठा
गेठ्याला मोडला काटा गेनुबा
गेठ्याला मोडला काटा
काट्याकुट्याचा येळू गेनुबा
काट्याकुट्याचा येळू
गाया लागल्या खेळू गेनुबा
गाया लागल्या खेळू
खेळ फुटतो फांद्या गेनुबा
खेळ फुटतो फांद्या
बैल डरतो नांद्या गेनुबा
बैल डरतो नांद्या
नांद्या बैलाची येसन गेनुबा
नांद्या बैलाची येसन
निळ्या घोडीवर बसन गेनुबा
निळ्या घोडीवर बसन
निळ्या घोडीचा खरारा गेनुबा
निळ्या घोडीचा खरारा
वाघ मारतो डरारा गेनुबा
वाघ मारतो डरारा
वाघापिलाची जाळी गेनुबा
वाघापिलाची जाळी
गाय कपिला काळी गेनुबा
गाय कपिला काळी
गायच्या कल्पना किती गेनुबा
गायच्या कल्पना किती
गायच्या कल्पना वीस गेनुबा
गायच्या कल्पना वीस
वीसाची घेतली घोंगडी गेनुबा
वीसाची घेतली घोंगडी
घोंगडी दोरा गेनुबा
घोगडीचा दोरा
गाया आल्या घरा गेनुबा
गाया आल्या घरा
दिन दिन दिवाळी
गायीम्हशी ववाळी
गायीपाशी चौरं बैल नवरं
बैल कुणाचं किशन देवाच
किशन देवा गुणगुण डोळ
आम्हांला सव्वा डोळ
आंबिकेच उदं उदं
भैरुबाचं चांगभलं
खंडोबाच्या नावानं चांगभल

🐂🐃🐂🐃🐂🐃
गाईगुरांना अर्थात वसुला गोग्रास देण्यामध्ये काय मजा असायची. चुलीवरच्या त्या बाजरीच्या भाकरी आणि त्याच्या बरोबर केलेली गवारीची शेंग भाजी आजीच्या हातची आम्ही जिला मोठ्याआई म्हणायचो. धम्माल असायची.

मामाची वसती तशी एकांडी. चोरा चिलटांची कायम भीती असायची. आम्हा नातवंडांमध्ये कायम एक भीती होती की मामाकडे बंदूक आहे. खरं तर दिवाळीच्या दिवसात मामा एकटेच रात्रीच्या वेळी माळवदावर जाऊन मोठे फटाके फोडायचे आणि आम्ही बंदुकीच्या फैरी झाडल्या म्हणून घाबरून अंधाऱ्या थंडीत आणखीनच मुस्कुटून झोपायचो. निखळ आनंदाचा दिवाळीला
 असाच काहीसा आनंद चांडगाव ला असायचा. दादा,अण्णा, आप्पा, बापू मोठीआई आणि ताई, आई सगळे एकत्र यायचे.मोठी आई आणि नाणी च्या माझ्या आईच्या हातच कोंढाळी आणि कापण्या म्हणजे दिवाळी. कधी कधी सेवेच्या लाडवांची लज्जत तर कधी दामटीचे लाडू एवढेच असलं तरीसुद्धा दिवाळी कोण सुखाची असायची. धमाल यायची सगळे एकत्र असायचे माणसांची मनं विरलेली नव्हती. संसार फाटलेला नव्हता.  जाताना मात्र रडारड व्हायची  जळगाव ला गेल्यानंतर पुन्हा सहा महिने येणे व्हायचे नाही कधी कधी उन्हाळ्याच्या सुट्टीत येता येत नसे, पुढच्या दिवाळीला यायच, त्यामुळे असेल. आता सगळंच गेलं
लहानपणची दिवाळी वेगळीच असायची आता दिवाळी चार दिवसात येते आणि जाते लक्षात राहील तो आनंद ती रडारड सगळं संपलं ती हुरहूर.
चला तर पुन्हा एकदा लहान होऊ यात दिवाळीचा आनंद लुटुया
 दिवाळी सणाच्या मनःपूर्वक चाकणे कुटुंबीयांकडून शुभेच्छा

ज्ञानसूत
संजय चाकणे

४ नोव्हे १८

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट