जपान: कर्तव्यदक्ष, जागृत, फिनिक्स====

मी पुणे विदयापीठात राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम समन्वयक म्हणुन नोव्हेंबर महिन्यात 2003 साली रूजू झालो. डॉ. अशोक कोळस्कर कुलगुरू होते. राष्ट्रीय सेवा योजनेने सलग सम पातळी चर व आपत्ती व्यवस्थापनाा या विषयात काही महिन्यात चांगलीच गती घेतली होती. जुन 2004 मध्ये सरांनी मला बोलावून घेतलं आणि "जपानला जाणार का ?", म्हणाले. नाही!, शब्दच माझ्या शब्दकोषात नसल्याने तात्काळ हो ! , म्हणालो. तात्काळ माझी व्हिसा काढण्यापासून तयारी सुरु झाली.
वास्तविक ही परिषद जगभरातल्या 40 देशातील 80 कुलगुरूंची आंतरराष्ट्रीय परिषद होती. “आपत्ती व्यवस्थापणात युवकांचा सहभाग” असा विषय होता. शोधनिबंध लिहणे, तयारी करणे, जमलं तर थोडेफार जपानी शब्द शिकणे, असा चांगला धावपळीचा मामला होता.

                   भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातुन आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाचा अनुभव तसा दांडगाच होता. मी स्वत: 26 जानेवारी 2001 च्या भुकंपानंतर 27 जानेवारीला 150 मुलांसह आपत्ती व्यवस्थापनेच्या कामासाठी टाचणीपासून सॅटेलाईट फोनपर्यंत सतर्कतेने मा. शांतीलालजींच्या नेतृत्वाखाली सजगतेने पोहचलो होतो. रोज 30,000 लोकांना जेवण देणे असा माफक उददेश होता. पुढच्या आठ दिवसांत शाळा बांधणेपर्यंत तो पोचला होता. मी तिथे जवळजवळ महिनाभर होतो. पुढे सहा महिन्यात 368 शाळा बांधल्या,  15 ऑगस्ट 2001 साली या शाळा तत्कालीन पंतप्रधान अटलजींच्या हस्ते लोकार्पण केल्या गेल्या.

लातुर भुंकपांनंतर 1993 साली 1200 मुले शांतीभाऊंनी पुन्यात आणली होती, याचेच वाघोलीला पुनर्वसन केंद्र आहे. 1996 ते 2003 या कालावधीत या मुलांच्या सहवासात आपत्ती व्यवस्थापनाचे धडे घेतले होते. तोच अनुभ्व दांडगा म्हणून गाठीशी होता.
या समृध्द अनुभवाच्या जोरावर मी जपानला जाण्याचा विडा उचलला होता. विमानप्रवासाची ही ऑस्ट्रेलीयानंतरची दुसरीच वेळ होती. व्हिसा व विमान टिकिटांसाठी श्री . बाबू  ट्रॅव्हल्स याांनी मदत  केली होती. मुंबईला जाउन व्हिसा घेतला होता. तशी जपानी व्हीसा घेण्याची पध्दत सोपी सुटसुटीत, त्यामुळे फारसे कष्ट न पडता सोपस्कार पुर्ण झाले.

विमानाचा प्रवास पुणे ते दिल्ली व नंतर दिल्ली ते ओसाका असा काही तासांचा प्रवास. आई ,बापु, रंजना आदिती असे अदल्या दिवशीच मुक्कामाला पनवेलला भावाकडे गेलो होतो. पहाटेचे विमान असल्याने रात्री 12 पासूनच आंघोळ करून तयार झालो. पहाटेच्या त्या पावसांत विमातळावर पोहचलो.
दिल्ली वरून 5-6 तासांचा प्रवास करून जपानच्या सांजवेळी सायंकाळी विमानतळावर उतरलो. तत्पुर्वी एक व्यक्ती सातत्याने मला 'मेलामेlee' करत होती. कसे यायचे? विमानतळावरून बाहेर पडल्यावर कुठे भेटायचे? व पुढे कसे जायचे? असे सर्व मेलवरून सांगण्यात आले होते. त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी बाहेर थांबलो माझ्या नावाचा बोर्ड घेउन एक चुणचुणीत तरूणी उभी होती. मी हात केल्यावर कमरेत वाकुन तिने हास्य केले. ते इतक्या जलदगतीने होते की मी भांबावुन  दोन पावले मागे गेलो.
            मी ज्यांना मॅडम म्हणून मेल वरून संबोधत होतो त्या मॅडम म्हणजे हीच तरूणी होती. मोडक्या तोडक्या जपानी इंग्रजीत तीने मला थांबायला सांगितले. त्यावेळी माझे ही मराठी इंग्रजी मोडके तोडकेच असल्याने आम्हा देाघांनाही एकमेंकांची भाषा लवकर समजली. थोडया वेळाने एक भारतीय विदुषी  तिथे आल्या, त्या मुलीने त्यांनाही तसेच अभिवादन केले. वास्तविक आम्ही दोघांनिही एकाच विमानातून प्रवास केला होता. त्याही भौतिकशास्त्र, विषय जवाहरलाल नेहरू विदयापीठात शिवकणारया असल्याने आमची लगेच मैत्री झाली. पुढचे 6-7 दिवस, आपल्याशी बोलायला कोणीतरी , भारतीय व्यक्ती आहे या भावनेने मी सुखावलो होतो. तिथुन पुढचा प्रवास बुलेट ट्रेन ने होता. त्या मुलीशी मोडक्या तोडकया गप्पा चालु होत्या. त्यातच कळाले ज्या मॅडम मेलवरून संपर्कात होत्या त्या म्हणजे हीच मुलगी. वास्तवीक ती आपल्याकडच्या एस.वाय.बी.ए. शिकणारी विदयार्थीनी होती आणि एस.वाय.बी.ए. मधील एका कोर्स मधील काही Credit साठी  परदेशी विदयापीठातील कुलगुरूंची परिषद आयोजित करणे हा त्यांचा अभ्यासक्रमाचा भाग होता. खरंतर ती 40 जणांची आयोजन करणारी टीम होती. एक प्राध्यापक या सर्व मुलांच्या मागे कार्यरत होते. पडद्यामागून हेच सर्व जरी करत असले तरी या मुलांनी ज्या पद्धतीने तयारी केली होती, ती मात्र वाखणण्याजोगी अर्थात लाजवाब होती. आमची राहण्याची व्यवस्था पंचतारांकित हॉटेलमध्ये होती आणि त्यामुळे अर्थातच अत्यंत सुबक घाटणीचं ते राहण्याचे ठिकाण होतं. दुसऱ्या दिवशीचा नाश्ता हा हॉटेलमध्येच असल्याने आम्ही तिथे जेवलो. सकाळी सकाळी एवढं खाण्याची आपल्याला सवय नसते पण तरीसुद्धा ऑस्ट्रेलियाचा पूर्वीचा अनुभव पाहता पदरी आले पवित्र झाले या न्यायाने खाऊन घेतले आणि आम्ही बर्‍यापैकी खाऊन घेतलं त्यातल्या त्यात बरे पदार्थ म्हणजे कच्च्या पालेभाज्या काही माशाचे तुकडे व इतर काही.
          एकदाचे आम्ही कॉन्फरन्सला गेलो एकंदरीत कॉन्फरन्स  ही तोडक्या-मोडक्या इंग्रजीत होती. ऑर्गनायझर च्या बाजूने  जे लोक आले होते ते मात्र असखलीत बोलणाऱ्यापैकी होते. अर्थात जपानी भाषेतून ट्रान्सलेट करण्याची अर्थात अनुवादित करण्याची यंत्रणा उपलब्ध होती. परिषदेमध्ये वातावरण अत्यंत खेळीमेळीचं होतं. पॅनल डिस्कशन ठेवण्यात आलेली होती, त्यामुळे चार वक्ते एका वेळी पॅनल मध्ये असायचे आणि व्यासपीठावर जाऊन बसायचे जे वक्ते बसलेले आहेत त्यांच्या नावाची एक जपानी उभी पट्टी त्या वक्त्याच्या समोर लावली जायची. एक सोनेरी रंगाचा पेन ही समोर दिलेलं होतं. त्याच बरोबर oरोगामी पद्धतीने तयार केलेलं कागदाच एक गुलाबाचं फुल हे आमच्या कोटाच्या खिशाला लावलं जायचं. अतिशय सुबक पद्धतीने हे सगळे आयोजन होतं. ज्याचं प्रेझेंटेशन आहे  आधीच अर्थात मेलवरून मागितलेलं असल्याने त्याचं प्रेझेंटेशन सुरू होण्यापूर्वी तिथे लावलं जायच. माझा जो विषय होता तो चानेलीसिंग युथ एनर्जी फॉर डिझास्टर मॅनेजमेंट असा होता. आणि त्यामुळे, भारतात राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनात सहभाग कसा घेता येईल? यावर मी भाष्य करणार होतो.
          जपानी माणसं तशी वेळेची फारच पक्की. वेळा पाळणारी. अगदी तीन ते चार सेकंदाचा जरी उशीर झाला तरी पटकन माफी मागून मोकळी होणारी. माफी मागणे हे सुद्धा कमरेतून वाकून अगदी गुडघ्याला डोकं टेकेपर्यंत  असायची. ती त्यांची अभिवादन करण्याची अत्यंत सुरेख अशी पद्धती होय. आम्ही सगळ्यांनीच वेळा पाळण्याचा कसोशीने प्रयत्न केला. संध्याकाळी आम्हाला बडा खाना देण्यात येणार होता. जमिनीवर मांडी घालून आम्ही सर्व बसलो होतो आणि किमो घालून गयेशा जेवण वाढायला अतिशय अदबीने भोजन वाढत होत्या. आमच्यासमोर चौरंगा सारखं ताट ठेवायला लाकडी आसन ठेवलं होतं. मोठ्या काचेच्या भांड्यात तीन-चार तीन-चार जिवंत मासे आमच्यासमोर आणून ठेवले आम्ही प्रत्येकाने त्यातला एक मासा निवडायचा! असे आम्हाला सांगितले. आम्ही लहान मुलांसारखं तो तो तो ( that that) मासा निवडून सांगितला तोपर्यंत गरम पाणी असलेले घंगाळ आमच्या चौरंगावर आणून ठेवले. आम्ही निवडलेला मासा हातात लांबलचक हात मोजा घालून गयेशाने समोरच्या घंगाळात टाकला. पुढे काय काय होणार हे आम्ही अतिशय  ऊसस्फूर्तीने बघत होतो आणि काही मिनिटात त्यांनी तो मासा काढून आमच्या पात्रात वाढला. घंगाळ आणि मासे चे भांडण नेले आणि आमच्या दुभाषाने करा सुरुवात अशी खूण केली. मनातल्या मनात वंदनी कवळ म्हणायचा प्रयत्न केला पण जमेना कारण माझा एक डोळा माशाच्या डोळ्याकडे आणि दुसरा डोळ्याने इतर काय करतात असं तिरकस बघत होतो. दोन लांबलचक काड्या चौरंगावर होत्याच ज्यांना सुसी मासा कसा खायचा माहित होते त्यांनी भराभरा सुरुवात केली होती. तशी आम्हा सगळ्यांना सपाटून भूक लागली होती. अर्धवट शिजलेला मासा काही लोक chopsticks (खाण्याच्या काड्या) मदतीने अतिशय शिताफीने खात होते. आयुष्यात दोन काड्या एकाच हातात घेऊन माशात घुसवून त्यांचा तुकडा काढून खाण्याचा पहिलाच प्रसंग. सगळे खातात म्हटल्यावर मीही खायला लागलो. दिसायला अतिशय सोपे वाटणारे हे प्रकरण खूपच कठीण असते! हे समजायला वेळ लागला नाही. आणि तीन-चार प्रयत्नानंतर ती काड्यांची भानगड बाजूला ठेवून हाताने खायला सुरू केली. तिखट, मीठ, तेल, असे काहीही नसलेला पदार्थ खायची वेळ आली. पोटातले कावळे मात्र येऊद्या मासा  असे कोकलत होते. शेवटी मनाचा हिय्या करून हाताने माशाचा एक तुकडा गपकिन तोंडात टाकला. ओलं खोबरं खाल्ल्याचा भास होत होता. मग काय पुढच्या काही मिनिटात एका जीवाने दुसऱ्या जेवायला खाल्ले होते. दिल्लीमधील विदुषी बाई पक्या शाकाहारी होत्या. त्यांनी दुभा षाला सांगून, "काही शाकाहारी मिळेल का"? म्हणून चौकशी केली. तोपर्यंत मी मासा गट्टम केला होता. दुभाषाने जपानी माणसाला सांगून चौकशी केली आणि उत्तर दिले की फक्त सुख मिळेल मला वाटले. आपणही सांगितले मग मीही मला एक द्या तोपर्यंत पानात अनेक नवनवीन पदार्थ येऊन पडत होते. कोणी एकेकाळी हे पदार्थ पुस्तकात पाहिले किंवा वाचले होते. जसे समुद्री काकडी, ऑक्टोपस, खेकडा, नानाविध प्रकारच्या कोळंब्या आणि तांदळापासून बनवलेली साकी तेवढाच काय तो शाकाहारी पदार्थ होता. बाईंना एका मोठ्या मग मध्ये त्यांनी सूप आणून दिलं मलाही एक सूप दिलं. बाईंनी  घटाघटा प्यायला सुरुवात केली. मी आपलं आदबीने सावकाश घुट.... घुट सूप पित होतो. तेवढ्यात कपात काहीतरी वाजल्याचा आवाज आला. तिकडे बाईचं सूप पिऊन संपलं होतं. त्या ताडकन उठल्या आणि बेसिन कडे पळाल्या . त्याओकाऱ्या करू लागल्या कारण सूप शिंपल्यांपासून (पायला) बनवले होते. कपामध्ये शंख आणि शिंपल्यांचा आवाज येत होता. मी दुभा श्याशी हूज्जत घालू लागलो. अरे ते शाकाहारी आहेत तर तो म्हणाला समुद्रातील जलचरांपासून बनविलेल्या पदार्थांना आम्ही शाकाहारी समजतो. बाई मात्र तिथून चालत्या झाल्या. मी मात्र कधी समुद्र काकडी तर कधी ऑक्टों पसचा एखादा पाय tentacle अशी गिळगिळीत पदार्थ खात होतो. थोड्या वेळाने एका वाटीमध्ये नूडल्स वाढत गयेशा पुढे आली. ही मात्र लाल रंगाची होती. एक खाऊन झाल्यावर विचारल्यावर ते गांडूळ होते आता मात्र किळस यायला सुरुवात झाली होती. कसेबसे जेवण संपविले.
       
         पुढच्या दिवशी आम्हाला एका सातशे वर्षे जुन्या बुद्ध विहारात नेले होते. लाकडी बांधकाम असलेले हे बुद्धविहार अत्यंत पवित्र स्थान म्हणून मानले जाते. जपान मध्ये सुद्धा मूर्तीसमोर पैसे टाकण्याची प्रथा आहे तसेच नैवद्य, पेप्सी ,कोको कोलाच्या बाटल्या अगदी बियरच्या बाटल्या नानाविध पदार्थ (मांसाहार) सुद्धा ठेवण्याची प्रथा आहे.                                                                खूप ठिकाणी जुनी बुद्ध विहार कोतो क्षेत्रातील अनेक ठिकाणी प्रक्षणीय स्थळे बघून, परतीच्या प्रवासासाठी ओसाका विमान तळावर पोहोचलो. ओसाका विमान तळावर आम्ही तिघे चौघे वेगवेगळ्या विमानाने जाणार होतो. आम्ही इकडून तिकडे फिरत असताना अचानक सात-आठ जपानी पोलीस आमच्या समोर आले. त्यांनी आम्हाला सर्व बाजूंनी घेरले आणि hands up असे म्हणू लागले. एकाने पासपोर्टचे मागणी केली अर्धा-पाऊण तास चौकशी केल्यानंतर आम्ही शिक्षक आहोत असे म्हटल्यावर त्यांनी आम्हाला सोडून दिले. पण या अर्ध्या पाऊन तासात आमची अवस्था अत्यंत भेदरलेली झाली होती. पण नंतर जपानी पोलिसांकडून कळले की हा त्यांच्या कामाचाच एक रुटीन चेकअप चा भाग आहे. अशा पद्धतीने आम्ही आमचा जपानचा दौरा सफल केला. पण एकंदरीतच जपानी माणसाची शिस्त, त्यांची जिद्द, कमालीची स्वच्छता, कामसूवृत्ती प्रत्येक आपत्तीत कसलीही हानी न होता सावरून उभे राहण्याचे त्यांचे मनोबल माझ्या मनावर कायमचे घर करून राहिले.

संजय चाकणे 
ज्ञानसुत
२० ऑगस्ट २०१९

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट