माझी गडगिरी भाग - 2

रौद्रप्रतापी राजगड 

           भारतीय जैन संघटना महाविदयालयात राष्टीय सेवा योजनेचा कार्यक्रम अधिकारी असतांना जुलै महिन्यात राजगडावर दोन दिवसाचे वनसचेतन शिबिर घ्यायचे ठरले. पाऊस असणार याचा अंदाज होताच, आम्ही सगळे 150 च्या आसपास  होतो. सर्व  लवाजम्यासह तयारीने आलो होतो. साखर गावात गाडया लावून गुंजवणी वाटेवर पदमावती माचीवर चढून सुवेळा माची संजीवनी माची बालेकिल्ला चढून महादरवाजातून उतरून वाझेघर मार्गे पुन्हा वाघोली गाठायची असे साधे सुटसुटीत नियोजन होते.
साखर गावात (अफजलुखान वधाचा प्रताप केल्यानंतर या गावात आउसाहेबांनी हत्तीवरून साखर वाटली म्हणून या गावाचे नाव साखरवाडी) उतरलो. सरदार बांदल यांच्या  घरा समोरील जुन्या विरगळी व इतर काही शिल्प मुलांना दाखवून आन्हीक व नाष्टा उरकुन गड चढण्यास सुरूवात केली .  
पहिल्या टप्पा पार करतोय तोवर नभ मेघांनी आक्रमिले, काळोखभिन्न वातावरण असल्याने  दिसेनासे झाले. पावसाचा अंदाज आल्याने हळूहळू गड सर करायचा ठरले. साखळदंडाचा मार्ग  असल्याने एकएक करत आमची पलटन वर सरकत एकदाची गडावर पोहचली. पहिला मावळा  जेव्हा पदमावती माचीवर पोहचला तेव्हा धो धो पाऊस चालू झाला. भल्या सकाळी सुवेळा माचीकडे रवाना झालो. माचीकडे जाताना धो धो पावसातच चालावे लागल्याने अत्यंत निसरडा रस्ता, प्रपातासारखा पडणारा पाऊस, राजगडाचे ते रौद्र रूप, त्यातच चिखलात पडत धडपडत मारूतीरायाचे दर्शन घेऊन सरदार मोरोपंत पिंगळेच्या वाडयाचे अवशेष पाहून नेढयाकडे जाण्यासाठी वाटचाल केली. नेढयामध्ये जाण्याच धाडस कुणीही केले नाही. परत जेव्हा किल्ल्याच्या मागच्या बाजूस आलो तेव्हा लख्ख  ऊन पडले होते, तेरडयाच्या फुलांनी राजगडच्या बालेकिल्या मागची बाजू  गुलाबी, पांढरी लाल झाली होती. संजीवनी माचीवरील सदर बघून परतलो, आणि पुन्हा पावसाने थैमान घालण्यास सुरवात केली.  उजव्या बाजूस बालेकिल्याचा कातळ कडा व डाव्या बाजूस खोल दरी, एकच माणूस चालू शकेल अशी निसरडी पायवाट, मजल दरमजल करत बालेकिल्याला फेरी घालून पूर्ण परिक्रमा झाली.
         झेंडयाजवळ येऊन बसलो. सगळया मुलांना बिस्किट पुडयांचा वाटप केले. पावसात बिस्किट ओली होऊन सुद्धा  बिस्किट खात होते कारण पर्यायच नव्हता.  आम्ही सगळयांनी निर्णय घेतला की, पद्मावती मंदिरात कोणी ओल्या कपडयाने आत जायचे  नाही, आम्ही  स्वयंपाकाच्या तयारीला लागलो. धो धो पावसात भिजायचे, कारण पर्यायच नव्हता. कोण कोणाशी काय बोलत आहे हे समजत नव्हते. कशाचा कशाला मेळ नव्हता, सगळी मुले तशाच पावसात कुडकुडत धमाल मस्ती करत होती. आमची  खिचडी बिरबलाच्या खिचडीच्या गतीने पकत होती आणि पोरं ही प्रचंड दमली होती, देवीची आरती म्हणून  चढया आवाजात वदनीकवळ  म्हणत भोजनं झाली. झोपायची  तयारी सुरू झाली, 
प्रा. रमेश गायकवाड यांनी मला स्लीपींग बॅग दिली होती, ती उघडून मी  हळूहळू स्लिपींग बॅगमध्ये शिरलो. चैन गळयापर्यंत लावली, चेहरा तेवढा उघडा, थोडया वेळाने  पायाला गार काहीतरी लागलं. थंडीमुळे असेल असं मनाला बजावलं, पण थोडया वेळात बॅगेत पायाशी काहीतरी वळवळले, मनात शंकाच काहूर माजलं, हळूच उठलो,मी उठल्यामुळे बॅगेत हालचाल जास्त झाली. आता माञ माझंच अंग गार पडायला लागल आणि पटकन उठून चैन काढून बॅगेतून बाहेर आलो, माझ्या  बरोबर दोन ते अडीच फुट लांबीचे अंगठया एवढया जाडीचे महाशय बॅगमधून सरपटत बाहेर आले ऐवढया थंडीत कुंदलेल्या वातावरणात सुध्दा ब-याच जणांना घाम फुटला होता. पदमावती मंदीरात पळापळ सुरू झाली. एक जणांनी त्या मुक्या प्राण्याला काठीने उचलून दरवाज्यातून बाहेर टाकले. मग काय, सगळेच जागे, झोपेचे खोबरे झालेले, सकाळी नाष्टयाच्या वेळी बॅग खाली ठेवली त्यावेळी महाशयांनी ऊबी साठी डाव साधून  बॅगेत बस्थान जमवले  असावे,  बापरे म्हणजे मी दिवसभर साप पाठीवर वागवला होता🐍,
वा रे पठ्ठे, मग काय कप्पाळ झोपतोय?  एक अर्थाने आमची कोजागिरीच साजरी झाली.
पहाटे बालेकिल्यावर चढाई केली. बरसणाऱ्या संततधारेत बालेकिल्ला बसत उठत उतरलो खरतर खुरडतच,  दुपारी जेवणं उरकुन वाजेघर मार्गे वाघोलीकडे रवाना झालो.
राजगडावर तसा खुपदा गेलो. उन्हाळयातला राजगड,‍ हिवाळयातला राजगड, पौर्णीमेच्या स्वच्छ उजेडातला  केलेला तोरणा ते राजगडचा ट्रेक, अनेक सहली काढल्या पण कायम लक्षात राहिला तो पावसाळ्यातील पाठीवर दिवसभर  सापासह फिरलेला राजगड, 

छञपती  राजांचा गड तो राजगड,
माझ्या आवडीचा,
दर वेळेला  नव्याने  शिकविणारा राजगड.

चला गडकोट पाहूया,
भाळी धुळ लावूया.
                              

  गडप्रेमी                                                                                                                                                                                                                ज्ञानसूत                                                                                                             संजय चाकणे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट