इर्जिक

*इर्जिक*


इर्जिक, हलमा म्हणतात आदिवासी,

इर्जिक असायची नांगरणीला
इर्जिक असायची काढणिला
खुरपायला , भाळणीला
इर्जिक असायची मुळी भलरी गायला,
तरवाट गडयानं *भलरी दादा भलरी* सुरु केलं की काय अवसान यायचं,
येग रामाच्या बाणाचा वाढलाच म्हणायचा ,

इर्जिकीतल्या तेलच्यागुळवण्याची सय अजूनही येते,
गुढघ्यावर थापलेल्या तेलच्या
काळ्या गुळाच्या गुळवण्यात
कुस्करुन खातांना धमाल यायची,
कारण तांब्या पितळी आपलीच असायची ,

कोण म्हणतं इर्जिका संपल्या ?

आजही इर्जिक होते ,
इर्जिका होतात चावडीवर,
इर्जिका होतात यस्टीच्या थांब्यावर,
इर्जिका होतात हापिसात
वांझोटया झाल्यात इर्जिका ,
वायफळ असतात चर्चा
अमेरिकेच्या अध्यक्षाला अक्कल नाही इथपासून,
अंत कशालाच नसतो,
त्यांच्या लेखी कुणीच सुटत नाही,
धोनीलाही कळत नाही न
सानियानी बुरखा घालून खेळलं पाहिजे
काहिच वर्ज्य नसतं बडवलेल्या बैलांना : . . ' .

भारत उन्नत बनवायचा असेल
तर ,

इर्जिकीच्या तुताऱ्या नव्याने फुंकाव्या लागतील ,

पांढरे डगले टाकून,
बाहुबेंडकुळ्या टराराव्या लागतील
लंगोटी कसाव्या लागतील,
ढोल बडवावे लागतील
बैलांना माज आणावाच लागेल

आपल्या भलरीला
जिवंत ठेवावीच लागेल.

*ज्ञानसुत*

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट