स्वर्णवर्ख रासेयोचा भाग 1

  दिल्ली मध्ये19 नोव्हेंबर 2015 रोजी मा. राष्ट्रपती यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा योजनेचे उत्कृष्ट महाविद्यालय व इंदापूर महाविद्यालयातील प्राध्यापक धनंजय भोसले यांना उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी पुरस्कार घेत असताना, मागच्या 25 वर्षाचा सगळा आलेख सारीपाटा सारखा सरसर सरकत होता. पुरस्काराची रंगीत तालीम करण्यापासून पुरस्कार घेऊन दिल्लीहून पुणे व परत इंदापूरला येईपर्यंत एकएका प्रसंगात कितीतरी वेळा मिरवत होतो. सगळ्या कडू-गोड आठवणींनी मन सैरभैर झालं होतं.



पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालयात 1990 साली प्राध्यापक म्हणून रुजू झालो. प्राचार्य के एस पाटील होते, व राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी ई जे  जगताप होते. बाणेर ला रासेयोचे शिबिर होते. आम्ही चौघे सकाळी कॉलेज करून सायकलवर सांगवी ते बाणेर असं डबल सीट जाय चो. मुक्काम करायचा उत्साह असायचा. 1992 लागले व  डॉक्टर एस एन पठाण आमचे प्राचार्य झाले. त्यांनी मला कार्यक्रमाधिकारी केले. तसा मी राष्ट्रीय छात्र सेनेच्या कॅडेट. अकरावी ते टीवाय पर्यंत एनसीसी अतिशय उत्साहाने भान विसरून जूनियर अंडरऑफिसर पर्यंत मजल मारली होती. त्यामुळे रासेयोचे  कार्यक्रमाधिकारी पद घ्यायला मी नाखुश होतो. उलटपक्षी राष्ट्रीय छात्र सेनेचे एकेक घेण्यासाठी प्रयत्न करत होतो. पठाण सरांचा आदेश असा होता की मला नाही म्हणणे जड गेले. आणि पुढे काही वर्षांनी मी कसा रासेयोमय झालो ते कळलेच नाही.

 अज्ञानाच्या राक्षसाचा नायनाट

 नतहे पथनाट्य आम्ही बसवले. त्यामध्ये बाबुरावजी घोलप महाविद्यालयातील रासेयो हे अल्पावधीतच नावारूपाला आलं. सुरेश अलीझाड रासेयोचे कार्यक्रम समन्वयक होते त्यानंतर श्री नंदकुमार निकम व राम गंभीर यांच्याशी छान गट्टी जमली यामुळेच तीन वर्षात बरीच कामे झाली. विशेष करून महेश पतंगे, दिलीप करंजकर, प्रदीप कांबळे, अविनाश काळे, मनोज कांबळे, अशोक वीर, वंदना अभ्यंकर, अंजली घोडके, या व अशा अनेक विद्यार्थ्यांनी जीव तोडून कामे केली. 27 मिनिटांचे शिक्षणावर आधारित हे पथनाट्य त्यावेळी खूप गाजले. मारुंजी हिंजवडी, जांब, देहूरोड व याचबरोबरीने नवी सांगवी दापोडी, डुक्‍करवाडी, पिंपळे सौदागर पिंपळे निलख या परिसरात रासेयोनी जनजागृती व समाज प्रबोधनाची कामे केली.

तत्कालीन राज्यपाल मा. पी सी अलेक्झांडर हे दरवर्षी आपल्या लवाजम्यासह पुण्याच्या राजभवनाला राहायला येत असत. 1993 मध्ये त्यांनी वृक्षारोपणाची संकल्पना मांडली. आणि पुण्यातील सर्व महाविद्यालयातील रासेयो चे सर्व विद्यार्थी व सरकारी यंत्रणा यांनी एकत्र येऊन 15 ऑगस्ट रोजी एकत्रित वृक्षारोपण करायचे,असे ठरवले, त्याप्रमाणे आत्ताच्या जगताप डेअरी पिंपळे निलख येथे वृक्षारोपण करण्यात आले. आजही यातील बरेचसे वृक्ष दिमाखाने वाढत आहे. मा. राज्यपालांचे त्यावेळचे अस्खलित इंग्रजी भाषण आजही मनात घर करून आहे. सरकारी यंत्रणा व रासेयोची गट्टी जमली तर काय होऊ शकते, याचा हा उत्कृष्ट अनुभव होता.
श्रीमती नयना कोंडे देशमुख प्राध्यापक लतेश निकम प्रा पंडित शेळके जे पुढे विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक व रा से यो चे समन्वयक झाले प्रा सुरेश रसाळे प्रा महेंद्र अवघडे प्रा संगीता शिंगटे नंदकुमार फापाळे, अशी सुरेख टीम तयार झाली होती.

पहिला कॅम्प मान येथे होता.  जे वाकड हिंजवडी कडून घोटावडे अर्थात बापदेव घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आहे. आज या गावात गेलो तर या गावाचे गावपण हरवले आहे. 1993 मध्ये मान गावातून सांगवील  सात नंतर येताना भीती वाटायची. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे तत्कालीन अध्यक्ष मा. रामकृष्ण मोरे यांनी मान  गाव दत्तक घेण्यासाठी सांगितले होते.
        गाव एकत्र आणणे गरजेचे होते. म्हणून आम्ही शंभर मुले मुली व प्राध्यापकांनी ठरवले की गावातला एखादा दुवा शोधायचा त्याप्रमाणे शोधांची  लगबग सुरू झाली. जेवे पाटील नावाच्या विद्यार्थ्याने आपण काकड आरतीला गेलो तर अशी कल्पना मांडली. पहिल्याच दिवशी झोपायला बारा वाजलेले. आणि काकड आरतीला जायचे म्हणजे सकाळी चार वाजता उठून आंघोळ करून जायचे होते. आम्ही सगळे पोहोचल्यानंतर गावकरी अवाक झाले होते. काकड आरतीला सुरुवात झाली. सहाचा जसा ठोका पडू लागला, तसे टाळकरी,मृदुंग वाजवणार्‍याच्या जागा पोरांनी कधी घेतल्या हे कळले नाही. आम्ही सुरात सूर मिसळून मळवट भरून काकड आरती मध्ये तल्लीन होऊन गेलो होतो. शेवटी
 *हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी*
हे झाल्यानंतर मी एक छोटेखानी भाषण केले व शिबिरात श्रमदानासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले. आम्ही  काल आल्यापासून गावात श्रमदानाचे काय-काय काम करणार इथपर्यंतची सर्व माहिती दिली. सकाळच्या श्रमदानाला आमची शंभर पोर. गावातली जवळजवळ तेवढीच मग काय पुढचे दहा दिवस न भूतो न भविष्यती असे श्रम गावात झाले. या गावात आम्हाला संध्याकाळचा स्वयंपाक कधीच करावा लागला नाही. रोज मुलांना कुणीतरी घरी जेवणासाठी बोलवत होते. त्यामुळे आम्हालाही रोजच सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी गावाला देता येत होती. त्यामुळे त्यामध्ये नाटकेही होत. यामध्ये जिजाबा कांबळे हा मारूजींचा माणच्या पुढे थोड्या अंतरावर हे गाव.
गडी दिसायला एकदम पैलवान. पण नाटकात पथनाट्यात जे काम करायचं ते अफलातून. त्यामध्ये आचारी नाही त्यामुळे मुलांकडून स्वयंपाक करणं कमा पात्र होते कामठे नावाचा शिपाई व महेश पतंगे यांची पोरं अशा कामाला लागून स्वयंपाक करायची मजा यायची. त्या काळात एक घोषणा आम्ही फार प्रचलित केली होती कारणही तसच मजेशीर होतं स्वयंपाक करायला सगळे नवखे असल्याने जे आहे ते गोड मानायचं मग जेवणापूर्वी *वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे* झाल्यावर खड्या आवाजात पोरं माझ्यामागे म्हणायची

*आज का खाना बहुत अच्छा l   
  खानेवाला बहुत अच्छा ll*
*खिलाने वाला सबसे अच्छा ll*

बोला पुंडलिका वरदे पंढरीनाथ महाराज की जय,
जय म्हटलं की सगळे जेवणावर तुटून पडायचे

पुढे नंतर वदनी कवळ घेता बदलून टाकलं

*वदनी कवळ घेता नाम घ्या कृषिवलाचे*
*सहज हवन होते नाम घेता शेतकऱ्याचे*
*जीवन करी जिवित्वा अन्न हे पूर्ण कर्म*

आणि पुढे अनेक वर्षे शिबिरात हीच प्रार्थना म्हणण्याचा
प्रघात पाडला.

काव्याचे विडंबन करून त्यात सकारात्मकता आणि हातखंडा होऊन बसला
शिबिरासाठी  जे अनुदान मिळायचं ते अत्यंत तुटपुंजी असायचं. तेही बऱ्याचदा वेळेत मिळायचं नाही. मग अशी ओढाताण गोळाबेरीज करून होऊन बसायचं. महाविद्यालयातून विद्यापीठाकडून उशिरा अनुदान मिळायचं जर कधी महाविद्यालयाकडून एककाला पैसे मिळयचे नाहीत. वर्षाच्या शेवटी अनुदानाची लेखी वेळेत सादर केली जात नव्हते नियमित कार्यक्रम नावाला व्हायचे कुठेतरी म्हणजे वडापाव, केळी, बिस्किट खाणे व महाविद्यालय स्वच्छ करणारी यंत्रणा होऊन बसली होती. मीही त्याचाच एक भाग मला तरी कुठे माहीत होतं की या सगळ्या अनुभवाचा कोरल्या गेलेल्या ठशांचा उपयोगही भावी काळात होईल...............

*ज्ञानसुत*
संजय चाकणे

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट