माझी गडगिरी भाग 20

जयतु  जयगड

          कोकणांत फिरतांना अनेक समुद्री  दुर्ग  पाहता येतात  अगदी, अर्नाळा,  कर्नाळा,  जंजिरा,  सिंधुदुर्ग, (मालवणचा किल्ला) विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग  हे सर्व जलदुर्ग
प्रकारातले पण समुद्राच्या काठावर  असणारा जयगड हा अत्यंत दुर्मिळ  व वेगळ्या धारणीचा किल्ला  अंदाजे  दहा एकराच्या  या किल्ल्याचे बुरुज आजही सुस्थितीत आहेत.
          तिन्ही बाजूनी असलेला समुद्र व शास्त्री नदीच्या खाडीमध्ये बेचक्यात तयार झालेल्या पठारावर वसलेला हा भुईकोट किल्ला, समुद्रातून कोणी पाहिले तर जलदुर्ग वाटावा. रत्नागिरी अर्थात पुढे पुळ्याच्या गणपती वरून माडगूळला केशवसुतांच्या स्मारकास भेट देऊन विशेषता स्टील फ्रेम मधला

'एक तुतारी द्या मज आणून
 फुंकीन मी ती स्वप्राणाने'


च्या अविर्भावातला पुतळा. केशवसुतांच्या साऱ्या कविता रेखीव  पूने  पणे  लिहिलेल्या. लहानपणी पाठ असलेल्या  वाचत, गुणगुणत पुढे जावे तर शेजारच्या दालनात सुसज्ज ग्रंथालय व प्रथितयश कवींच्या मराठमोळ्या, रांगड्या, नवकविता, दुर्बोध आडवळणाच्या अनघड कविता वाचून साहित्यिक मन असणाऱ्यांना मनस्वी आनंद होतो, खरे रे सांगू का तिथून हलुच नये असे वाटते, हाच साहित्यिक आनंद डोक्यात घेऊन पुढे गेलो.

          माडगूळच्या रस्त्यावरच्या मासोळी बाजारात फेरफटका मारण्याचा मोह काही केल्या आवरता आला नाही. मांदेली, तिसऱ्या, कोळंबी, ओले बोंबील, बॉम्बे ईल (डक) पापलेट, हलवा, निंबोऱ्या, खेकडे (लाल), बांगडा, सुके मासे, सुकट, बोंबील, सर्वात महत्वाची सुरमई बघून हरखुन गेलो होतो. वास्तविक पुळ्याच्या गणपतीला मुक्कामाच्या वेळी पापलेट व मालवणी रस्स्यावर येथेच्छ ताव हाणला होता. (उगीचच पुलंची आठवण झाली ती म्हणतात ज्या देहाने आयुष्यभर मासे रिचवले तो देह शेवटी समुद्रात टाकावा काही दिवस काही माशांचे पोट भरले तरी खुप) सोडे होते, पण कुणीतरी म्हणाले की जयगडला सोडे चांगले मिळतात. त्या खारावलेल्या वासाच्या हर्षान्मादात आम्ही जयगडकडे कूच केली. जिंदालचा प्रकल्प दुरूनच दिसू लागला या औष्णिक ऊर्जा प्रकल्पाजवळ आल्यावर त्याचे ते अवाढव्य रुपडे पाहून अकारण  दडपण येते.  विशेषत: धुराड्यातून बाहेर  पडणारे  थोडे  वर जाऊन  पुन्हा खाली येणारे काळकभिन्न  धुराचे लोट,  सर्व आसमंतावर काळी पांढरी  धुरकट  चादर पसरवणारी.


          एकदाचे आम्ही  जयगडच्या समोर  आलो  शत्रूला चकवा देणाऱ्या दरवाजातून आत जाण्यापूर्वी 20-30 फूट रुंदीचा  खंदक 15-20 फुट खोली शत्रु सहजी  गडावर येऊ नये, यासाठी जांभ्या - लाल  खडकात खोदून  काढलेला. गडाच्या भिंती  30 ते 40  तर  काही ठिकाणी त्याहूनही उंच. सुस्थितीत असलेल्या  गडकोटाच्या भिंती, दरवाजा,  आगळीची रचना,  दरवाजावर असलेली कोरलेली ओळखता न येणारी मूर्ती.  दरवाज्यात उभे राहिल्यावर दोन्ही बाजूने थंड वारे येते, ती थंड झालर पाण्याचा शिडकावा अंगावर पडल्यासारखी शिरशिरी घेऊन रोमांची अनुभूती घेत आपण पुढे जातो. दोन क्रिकेटचे ग्राउंड मावतील एवढा विस्तीर्ण परिसर मधोमध सरखेल कान्होजी आग्रेंचा दुमजली वाडा, यात अर्थातच भग्नावशेष. शेजारीच एकमेकीला जोडणाऱ्या दोन बारवा, तिन्ही बाजूनी खारे पाणी असल्यावर गडकरऱ्यासाठी पिण्यायोग्य पाणी असावे, म्हणून पावसाचे पाणी साठवणारी यंत्रणा. शेजारीच कोकणी पद्धतीचे गणेशाचे मंदिर (पत्रा असलेले), ते नंतरच्या अर्थात पेशवाईच्या काळात बांधलेले असावे.


     गणेश मंदिराच्या समोरच जयाबाबा (याचे वरूनच जयगड नाव पडले असावे) चे मंदिर आत फक्त छोटा तांदळा. गडावर चहूकडून कोटावर चढण्यासाठी सोपान केलेले फुटभर उंचीच्या पायर्‍या चढून जावं आणि निळशार पाणी, गार मदमस्त समुद्रावरून येणारा वारा, फेसाळसाऱ्या लाटा. तर लांब पल्याड गलबतं, शिड टाकून समुद्रात गळ टाकून किनाऱ्यावर रंगीबेरंगी झेंडे पताका फडकवत रुतून बसलेली.
          मोगलांकडून कोकणातल्या नाईकांकडे नंतर कान्होजी आग्रे - पेशवाई व 1818 नंतर इंग्रजांच्या ताब्यात गेलेला हा किल्ला प्रत्येक काळातल्या खुणा आजही साठवून आहे.
       मुख्य दरवाजाच्या वर दुमजली इमारतीत टाइल्स बसवून इंग्रजांची कचेरी अजूनही सुस्थितीत आहे. शौचालयाची मात्र देखभाल नसल्याने वाईट अवस्था. चारी बाजूने कोटावरून फर्जंदावरून फिरता येते.


      जयगड किल्ल्यावरून जयगड गावात मासे मिळतील का या हेतूने गेलो कासेकर, सोंडकर अशी आडनावे असलेल्या मुस्लीम बांधवांशी बोलताना त्यांनी कर्मकहाणी कथन केली. जी गलबत अर्थात होड्या तारवे होती ती मासेमारी संपल्यामुळे औष्णिक प्रकल्पामुळे कैक मैलापर्यंत मासे सापडत नाहीत त्यामुळे मुंबईला जाऊन चाकरमानी होणे यापलीकडे काहीच नाही.
      तरीही काहीजण कोळंबी वा छोटे मासे वाळूवून सुके खारवलेले मासे तर सोडे विकतात सोडे घेऊन आम्ही इंदापूरकडे रवाना झालो विकासाच्या औद्योगिकरणाच्या या  धबडग्यात आम्ही छोटे उद्योग बंद तर करीत नाही ना? या विवंचनेत जयतु जयगड करीत शिवरायांचा आठवावा प्रताप म्हणत पोहोचलो


*संजय चाकणे*
*ज्ञानसूत*

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट