*भीमाशंकर ते भीमाशंकर*

       

           राष्ट्रीय सेवा योजनेचा मी कार्यक्रम समन्वयक झालो ती 2003 सालातली गोष्ट. काहीतरी मोठे काम उभे करायचे हा सर्वसामान्य सद्हेतू मनात ठेवून काम सुरु केले. डॉ. विवेक सावंत (MKCL) यांनी श्री श्री वसंत टाकळकरांची भेट घडवून आणली आणि सलग समपातळी चर, पाणीप्रश्न, जलव्यवस्थापन, जलसाक्षरता, पर्जन्य त्यांचे मोजमाप, अगदी थेंबा थेंबा चा हिशोब असे विषय रुंजी घालू लागले. डॉ. अशोक कोळसकर हे अत्यंत द्रष्टे कुलगुुरु कायम नव दृष्टी देणारे, काम करून घेणारे, सलग समपातळी चर





 हा अत्यंत तांत्रिक प्रयोग रुजवायचा म्हणजे मोठी मेहनत - ताकत पणाला लागणार होती.  तत्पूर्वी वसंत टाकळकर स्वतःला जंगली माणूस म्हणायचे रोज चर्चेच्या फैरी झडत होत्या. शेवटी मला एक उपाय सुचला तो म्हणजे सर्व कार्यक्रम अधिकाऱ्यांना 5 दिवस एकत्र करून ट्रेनिंग द्यायचं विद्यापीठात एवढ्या लोकांना जागा मिळणार नाही म्हटल्यावर सप्तशृंगी गड, भीमाशंकर, बहाई इ अकॅडमी, अगदी बालेवाडी सह बऱ्याच नावांचा विचार झाला. घोडेगावला सन्मित्र डॉ. इंद्रजीत जाधव प्राचार्य होते. त्यांना फोन केला आणि ते लगेच हो म्हणाले एवढेच नाही तर उद्या या जागा बघू. सर्वांना मासवड्या चे जेवण देतो वगैरे वगैरे. आणि एकदाचे भीमाशंकर ठरले. राज्याचे शिक्षण मंत्री मा. दिलीपराव वळसे पाटील होते, उद्घाटन त्यांच्या शुभहस्ते होते, तशा पत्रिकाही छापल्या. मा. डॉ. बी. के. धोंडे ( ज्यांचे कंटूर मार्कर जो सलग समपातळी चे जरा खाण्यासाठी वापरला जातो त्याचे अमेरिकन पेटंट होते, परंतु त्यांनी ते समाजासाठी मोफत वापरायला दिले होते) डॉ. अरुण देशपांडे ( ज्यांनी वॉटर बँक ही कल्पना प्रथमतः मांडली) आणि अर्थातच श्री वसंत टाकळकर, डॉ. विवेक सावंत, डॉ. अशोक कोळसकर, श्री. तेज निवळीकर अशी सर्व दिग्गज मंडळी होती. 


वनखात्याच्या पटांगणात मंडप टाकून कार्यक्रम होता. विद्यापीठाच्या प्रशासकीय धबडग्यात व कार्यपद्धतीमुळे मला व निवळीकर सरांना दोन तास उशीर झाला कार्यक्रम अत्यंत देखणा झाला. शिक्षण मंत्री येऊ शकले नाहीत. समपातळी चे प्रशिक्षण खऱ्या अर्थाने सुरू झाले. वास्तविक राष्ट्रीय सेवा योजनेच्या नवीन ऊर्जेची ती नांदीच ठरली. सलग समपातळी अर्थात सी सी टी चे प्रशिक्षण अत्युत्तम झाले. तिथे आलेल्या प्रत्येकाला सी सी टी चे महत्व कळाले सार्थक दिसत होते. पाणी जमिनीत मुरवण्याचा सी सी टी हा सर्वोत्तम पर्याय आहे. आलेले सर्वच प्राध्यापक जमिनीशी नाळ जोडणारे असल्याने सी सी टी हा परवलीचा शब्द इतका रुजला की पुढे या विषया माझ्यासह अनेक जण तज्ञ झाले, 


लेखक, प्रशिक्षक वक्ते झाले वानगी दाखल प्रा. रिकामे, प्रा. चोळके, प्रा. सोनवणे, प्रा. गीते, प्रा. काकडे, प्रा. भंडारी, प्रा. घोडके, प्रा. माळुंजकर , प्रा. ठाकरे, प्रा. इनामदार, प्रा. कोल्हे, प्रा. मुल्ला, प्रा. शिंदे, प्रा. फडतरे, प्रा. भामे असे कितीतरी प्राध्यापक सीसीटी च्या माध्यमातून तयार झाले. यातील अनेकांना विभाग, जिल्हा, विद्यापीठ, राज्य, राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार मिळाले.            

          दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात मोठ्या मथळ्यात पहिल्या पानावर बातम्या आली राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात **** पक्षाचा प्रचार. वास्तविक असे काही घडले नव्हते. तरीही बातमी आल्यामुळे मी उद्विग्न झालो होतो हे शिबिर संपल्यानंतर मा. कुलगुरूंना भेटायला गेलो. कारण हा विरोध मला सहन झाला नव्हता. कुलगुरूंना म्हणालो "सर, मी परत भारतीय जैन संघटना कॉलेजला प्राध्यापक म्हणून जातो". 

सरांनी जे सांगितले ते अफलातून होते, ते म्हणाले,
 "तू नशीबवान आहेस, एवढ्या कमी वयात एवढा विरोध! ही खूप मोठं होण्याची नांदी आहे. स्वतःला भाग्यवान समजा की तुम्हाला विरोध होतो आहे".
या एका वाक्याने खूप बळ मिळाले. खरेतर ही गोष्ट राष्ट्रीय सेवा योजने मध्ये काम करण्यासाठी व जो जे नवचैतन्य व उर्मी देणारी ठरली. 
                     
                     2019 ची दिंडी, ही सर्वार्थाने वेगळी दिंडी आयोजीत केली गेली. श्री राजेश पांडे यांनी "35 हजार विद्यार्थी दिंडीत सहभागी होतील" असा विषय मांडला. आम्ही तो सगळ्यांनी उचलून धरला, विशेषतः मा. कुलगुरू , प्र-कुलगुरू, कुलसचिव, श्रीमती बागेश्रीताई मंठाळकर, डॉ. मोहन वामन , डॉ. विलास उगले, श्री मिलिंद वेर्लेकर, प्रा. थिगळे, प्रा.  वाखारे आणि या सगळ्यांचा समन्वय करणारे डॉ. प्रभाकर देसाई.
          गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करायचे त्याचबरोबर रोज एक हजार विद्यार्थी पालखी मुक्कामाच्या ठिकाणी आणायचे होते.
              हे काही येऱ्यागबाळ्याचे नियोजन नव्हते. मी सहज कल्पना मांडली,"यासाठी आपल्याला प्राध्यापकांचे प्रशिक्षण शिबिर घ्यावे लागेल."
 कुठे घ्यायचे? काय घ्यायचे? ठरत असतानाच, डॉ. मोहन वामन यांनी "भीमाशंकरला एका रिसॉर्ट मध्ये घेऊयात!" अशी माहिती दिली व देसाई लगोलग कामाला लागलेही. त्यांनी भीमाशंकरला कार्यक्रम अधिकाऱ्यांनी यावे म्हणून आवाहन करणारे पत्र विद्यापीठाच्या वेबसाईटवर टाकले, आणि पुढील दोन-तीन दिवसांनी एका वर्तमानपत्रात 'कार्यशाळेसाठी रिसॉर्टमध्ये पैशाची उधळपट्टी,' अशी बातमी आली. भीमाशंकर ते भीमाशंकर असे वर्तुळ पूर्ण झाले.

        भीमाशंकरच्या शिबिरात 350 हून अधिक प्राध्यापकांनी हजेरी लावली व प्रशिक्षण अत्यंत नेटके झाले. 'ये हृदयी चे ते हृदयी' पोहोचविण्यात आम्हाला यश आले. कार्यक्रम अधिकाऱ्यांनी अतिशय मन लावून सर्व गोष्टी केल्याने, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड चा attempt व वारीचा एकूणात प्रयोग कमालीचा यशस्वी झाला. अर्थात या मोठ्या नियोजनात काही त्रुटी मात्र राहून गेल्या विशेषतः गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड च्या वेळी काही झाडांची हेळसांड झाली तर काही स्वयंसेवकांच्या जेवणाची आबाळ झाली. आम्ही संयोजक म्हणून ही जबाबदारी स्वतः स्वीकारली आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने एखादा नवीन मोठा कार्यक्रम घ्यायचा असे ठरवून हे वर्तुळ पूर्ण केले. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्थापनेच्या पन्नासाव्या वर्षात हे काम पूर्ण करता आले. याचा मनस्वी आनंद आहे.

संजय चाकणे
ज्ञानसुत

20 जुलै २०१९

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट