*चार दशकानंतर गुरुजींची भेट*


       मे महिन्याच्या सुट्टीमध्ये फेसबुकच्या भिंतीवर एक  कविता झळकली. कविता वाचत असताना ती अत्यंत ओळखीची व जवळची वाटली. मी गुणगुणत एका दमात वाचून काढली लहानपणी ही कविता खूपदा तालासुरात गायली असे वाटत गेले. कवितेच्या शेवटी कवीचे नाव होते *कविवर्य उत्तम कोळगावकर* कविता संग्रह *छप्पापाणी* ती कविता म्हणजे

गजबपूरचा
अजब राजा
त्याने केली
काय मजा
लोकांना म्हणाला,
"नाचा खूप
बसू नका
कोणी चूप

नाचता नाचता
गाणं गा
गाता गाता
पेढे खा

पेढे खाऊन
हसा हसा
खुशीत सगळे
दिसा दिसा!"

अजब राजाची
गजब बात
त्याने केले
कायदे सात

त्यातला होता
एक असा
प्रत्येकाने
पाळावा ससा!



          पुन्हा एकदा गुणगुणत कविता म्हटली लगेच शेअर केली. हे करत असताना मन चाळीस वर्ष मागे गेलं 1979 - 80 साली वडिलांची बदली जळगाव जिल्ह्यातील रिंगणगाव वरून धरणगावला झाली. त्यावेळी मी आठवीत होतो इंग्रजीच्या पहिल्या तासाला काहीच कळत नव्हतं. याचं कारण रिंगणगाव ला असताना पाचवी ते सातवी आम्हाला इंग्रजी नव्हतं. याचे कारण म्हणजे, शिकवायला कोणी नव्हतं. रिंगणगाव ला आठवीत पहिला महिना लोअर इंग्रजी होते. आणि धरणगावला गेल्यानंतर मात्र हायर इंग्रजी शिकावं लागलं. शिकवणारे सर होते ते म्हणजे कविवर्य *उत्तम कोळगावकर* माझी अडचण लक्षात आल्यानंतर त्यांनी मला 'तू माझ्या घरी इंग्रजी शिकायला ये' असे सांगितले. आम्ही 5 ते 6 जण सकाळी 05:30 ला सरांच्या घरी जात असूत. सर अत्यंत तळमळीने व मन लावून आमची मोफत शिकवणी घेत होते. कधीतरी तंद्रीत आल्यावर आम्हाला ते कविता ऐकवायचे.
        त्यांचा पहिला कवितासंग्रह म्हणजे *छप्पापाणी* सरांची मोठी कन्या त्यावेळी नुकतीच बोलू लागली होती तिला छप्पापाणी म्हणता यायचं नाही ती त्याला *पप्पापाणी* म्हणायची. सरांच्या कविता आम्हा मुलांना खूप आवडायच्या. अर्थात बालवय असल्याने छप्पापाणीतल्या बऱ्याचशा कविता आमच्या पाठ झाल्या होत्या. त्यातील काही *माळीदादा, माळ्याच्या मळ्यात, माझ्या वर्गात, नव पुस्तक, खुजोबा हसुबाई* इत्यादी.









          काही महिन्यात माझी इंग्रजीची प्रगती वाचण्यापर्यंत झाली. सर आम्हाला महात्मा फुले हायस्कूल मध्ये शिकवायचे. सरांनी आठवीच्या वर्गात एक घोषणा केली, ती म्हणजे आपण साहित्य संमेलनासाठी इचलकरंजी ला जायचे!
           खरेतर कवितेची अर्थात साहित्याची गोडी रुजवली, म्हणून आम्ही सगळ्यांनी घरात हट्ट करून इचलकरंजीला जायचं ठरवलं, आणि साहित्याचं बाळकडू आम्हा सगळ्यांच्या गळी उतरले. आजही ते भूत मनी रुंजी घालत असत. मी भौतिकशास्त्राचा विद्यार्थी असलो तरी काहीना काही लिहित असतो. त्याचं मूळ कुठेतरी सरांच्या या भेटीत खोलवर रुतलं होतं. पुढच्या वर्षी 1981 साली आम्ही नुकतेच दहावीत गेलो होतो. सर आकाशवाणीमध्ये नोकरीला लागले होते. आमचा अख्खा वर्ग सर जाताना ढसाढसा रडला होता.
13 जुलै 2019 ला नाशिकला यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सभेसाठी जायचे होते म्हणून आदल्या दिवशी मी सरांना फोन केला. आणि आणि आमची भेट ठरली सायंकाळी 4 वाजता एका हॉटेलमध्ये भेटलो.




चाळीस वर्षानंतर सुद्धा खूप दूरून मी सरांना ओळखू शकलो. खूप कमी वेळात आमच्या खूप गप्पा रंगल्या सरांनी मला आठ कवितांचा संग्रह भेट दिला. गुरूंची ही  भेट गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला कृतकृत्य झाल्यासारखी होती. सरांना आणि मलाही खूप बोलायचे होते. परंतु, पुढच्या भेटीत नक्की, असं ठरवून जड अंतकरणाने निघालो कारण नाशिक वरून इंदापूर गाठायचे होते.

    *ज्ञानसूत*
*संजय चाकणे*

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट