*वारी ते वारी*.........
.............२००४ ते २०१९


          श्री प्रसेनजीत फडणवीस यांचा फोन आला. आपल्याला वारी संदर्भात मुख्यमंत्री साहेबांना भेटायला जायचे आहे. आम्ही अत्यंत उल्हासित झालो, कारण माझ्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या 29 वर्षाच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच मा. मुख्यमंत्र्याकडे सादरीकरण करण्याची संधी मिळणार होती. आम्ही तयारीला लागलो कारण नियोजन फार मोठे होते. पहिल्यांदाच वारीमध्ये 35,000 रासेयो सहभागी होणार असल्याने जबाबदारीची जाणीव होऊ लागली होती.
          यातच आठवायला लागले ते 2004 साली पहिल्यांदा वारी चे आयोजन केले तो प्रसंग. मी नोव्हेंबर 2003 मध्ये पुणे विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेचा कार्यक्रम समन्वयक म्हणून रुजू झालो. प्रा. श्रीमती नीलुफर अहमद राज्य संपर्क अधिकारी होत्या. मार्च महिना संपला त्या म्हणाल्या 'चाकणे आपण एन. एस. एस. का एक बडा प्रोग्राम करेंगे', मी ही  विचार करू लागलो होतो.
       
       कोथरूडला म्हसोबाच्या यात्रेनिमित्त माझ्या सासऱ्याकडे अर्थात श्री.  भिकनराव भुजबळ यांच्याकडे गेलो होतो.
गप्पांच्या ओघात ते कसे दिंडीला जाणार आहेत?, दिंडी मध्ये जाण्यासाठी तशी तयारी लागते? वगैरे, अर्थात बाबुरावजी घोलप महाविद्यालयात असताना सन्मित्र प्रा. लतेश निकम नेहमी आळंदीला न्यायचा, कधीतरी वारीत जायचे असेही ठरायचे, पण अस्तित्वात नव्हते आले.
            हा विषय डोक्यात घेऊन मी विद्यापीठात गेलो, आणि एकदम विज चमकल्यासारखा लख्ख प्रकाश पडला आणि ठरलं वारीमध्ये रासेयोचे स्‍वयंसेवक न्यायचे. मी मॅडम निलुफर यांना फोन केला व सांगितले की मोठा कार्यक्रम सुचलाय! तो करायचा का? त्या म्हणाल्या, "मैं कल आती हूं!" आम्ही दुसऱ्या दिवशी तत्कालीन कुलगुरू डॉ. अशोक कोळस्कर होते त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी लगेच तयारीला लागा असे सांगितले. एमकेसीएल चे डॉ. विवेक सावंत, डॉ. अरुण देशपांडे, वसंत टाकळकर अशी दिग्गज मंडळी आशीर्वाद द्यायला होती.




         मी, सोलापूर विद्यापीठाचे प्रा. तुकाराम शिंदे, कोल्हापूरचे संजय ठिगळे  व नीलुफर मॅडम, प्रा. नितीन घोरपडे, भूषण फडतरे, कैलास सोनवणे, भिमराव मोरे अशी एक फळी तयार झाली.


           केंद्र सरकारचे कॅप्टन सुभाष, फायनान्स ऑफिसर श्री महादेव उर्फ एम. एस. जाधव, श्री. दिनेश जाधव, श्री प्रदीप कुलकर्णी असे प्रत्येक ठिकाणी मुक्काम कुठे करायचा? असे ठरवून, पुढील ठिकाणी जाऊन आलो. काही ठिकाणी मुक्काम करणे शक्य नव्हतं, पण आमचा आत्मविश्वास मात्र वाढला होता.                                     
         २० दिवसांचा अवधी हाताशी होता, दुसऱ्याच दिवशी संत ज्ञानेश्वर पालखी मार्गावर पायलट टिम घेऊन जायचे ठरले , पहिले भोजन प्राचार्य रावळ एच् ही देसाई महाविद्यालय, दुपारी नाश्ता, डॉ नितीन घोरपडे संध्या  अण्णासाहेब मगर महाविद्यालय, असं करत पंढरपूर पर्यंतचे नियोजन ठरले , सावंत सरांनी, वृक्षारोपण दिंडी अर्थात वृक्षदिंडी अशी संकल्पना मांडली,
नियोजन चोख झाले होते.
           
         उद्घाटनास ११ कुलगुरू, सर्व कार्यक्रम समन्वयक (बाईंचा धाकच तेव्हढा होता ) येणार होते.

महामहिम राज्यपाल
फजल *अहमद*
शिक्षणमंत्री निहाल *अहमद*
निलुफर *अहमद* व
खलील *अहमद* ( टि ओ आर् सी )

असे अहमदीय उद्घाटन होते, प्रोटोकॉल कडून तपासणी, राज्यपाल ऑफीसची तपासणी, सगळ साग्रसंगीत  पार पडलं,  पत्रिका छापल्या , मा. राज्यपाल असलयाने सुवर्ण किनारी देखणी सुबक वैगेरे , पहिली पत्रिका कुलगुरु साहेबांना देण्यासाठी बाळासाहेब नाईकांकडून वेळ घेतली, मी व मॅडम निलूफर रात्री आठ वाजता मुख्य इमारतीत गेलो , पत्रिका  बघुन सर खुष झाले, कौतुक _ चहापान झाले ,

 सरांनी, अचानक विदयापीठाची डायरी मागितली.
मला म्हणाले, "सगळ्या पत्रिका आता इथे मागवा, प्रोटोकॉल चे फॅक्स , सगळी फाईल" , काहीच कळेना, काय झालं ?
आम्ही आळी_पाळीने एकमेकांकडे बघत होतो,

सर म्हणाले, " घाबरू नका!  पण पत्रिका बदलावी लागेल,"
आम्ही सगळे एकासुरात
"का ?" असे विचारते झालो.
सरांनी आमच्या समोर डायरी पुढे केली, सगळ्यांच्या चूक लक्षात आली वास्तवीक फजल मोहम्मद हवे होते चुकून अहमद झाले होते, चूक सगळ्यांचीच होती, लागलो कामाला , रात्रीत पत्रीका बदलल्या या कानाची खबर त्या कामाला नव्हती, उद्धाटन मुख्य इमारतीच्या संत ज्ञानेश्वर सभागृहात देखणे झाले, आम्ही वृक्ष पालखी बनविली होती. सगळे पालखीचे भोई झालो, विदयापीठांचे कुलगुरू गेट पर्यंत वारकरी टोपी उपरणे या वेषात चालले, मी, डॉ नितिन घोरपडे , प्राचार्या अर्चना ढेकणे  प्रा कैलास सोनवणे , प्रा गिते , प्रा शेडगे, प्रा फडतरे, प्रा बगडाणे प्रा घोडके शेवटपर्यंत २० दिवस चालायचे ठरवले.



           २० विदयापीठांचे विद्यार्थी व त्यांचे संघनायक चांगलीच मांदियाळी जमली होती , महाराष्ट्रातील प्रा बिडवे , प्रा धनंजय माने तुकाराम शिंदे , तितरमारे, काळे, संजय ठिगळे असे अनेकजन होते. अमारातीहून रोंगरे महाराज आले होते.
परीक्षाच होती,
पहिलाच प्रयोग फसू नये म्हूनन खुप आटापिटा केला होता, योजकस्य दूर्लभ: ची जाण होतीच,
शेवटच्या दिवशी पंढरपूरला भाषणे झाली , किती शिकायला मिळाल ?
काय बदल झाला ?
जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा बदलला ?
आजही सगळ ताजं वाटतयं, कारण आम्ही सगळे समाजव्रती वारकरी झालो होतो समरसुन गेलो होतो,
*"वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे,"* हा बिनीचा अभंग झाला होता.






 पुढे प्रा इनामदार  प्रा  रिकामे प्रा चोळके प्रा शेळके ,माळी, प्रा.भामे, डॉ देसाई  असे अनेकांनी धुरा सांभाळली प्रदिप,दिनेश , मनोज अमोल हे सहकारी  सर्व वाहन चालक, अनेक विदयार्थी मित्र स्वामी, भांगे, प्रेरणा , किशोर,अमोल, किरण ( 3 )..... बाप रे सगळी आठवायला लागलेत, इतरांनी माफ करा
       मी स्वतः सहा वर्ष चाललो ज्ञानमय झालो, श्रीमंत झालो, या दिंडीला धार्मिकता येऊ दिली नाही.
या सगळ्या अनुभवाचे गाठोडं समृध्द झाले आहेच,
        मधल्या काळातील दिंडीचे स्वरूप बदलत गेले, सुरुवातीला असणारी वृक्षदिंडी नंतर स्वच्छ वारी, स्वस्त वारी, हरित वारी, निर्मल वारी अशी बदलत गेली. या काळात 02 व्यक्तीची मदत कायम स्मरणात राहिली एक म्हणजे सासवड येथे चालत असताना श्री नांगरे पाटील यांनी आवर्जून विचारले आणि आणि त्यांनी पोलिसांची दिंडी सुरू केली. तसेच उर्जा दिंडी च्या बाबतीत मेढा संस्थेचे श्री महेश झगडे हे वारीमध्ये आमच्या बरोबरीने चालले होते.
























     एका  दिंडीच्या वेळेस दिंडी च्या आदल्या दिवशी कुलगुरू कार्यालयामधून मला फोन आला, "तुम्ही तात्काळ मुख्य इमारतीत या"! असा निरोप मिळाला. आवाजातला वेगळेपणा जाणवला, नीलुफर मॅडम ही होत्या,  मी त्यांना म्हणालो "चला." तिथे गेल्यावर आम्हाला सांगण्यात आले, 'उद्यापासून सुरू होणारा एन एस एस दिंडी कार्यक्रम रद्द करा' का? व कशासाठी? हे ऐकायला सुद्धा कोणी तयार नव्हते. त्यावेळी 17 विद्यापीठांमधून आणि आणि कर्नाटकातील शिमोगा मधून 10 मुले अशी दोनशेच्या वर आली होती.
         जेवणाचे साहित्य, टेम्पो  सगळं काही तयार होतं. आता करायचे काय? असा प्रश्न पडला त्यावेळी तत्कालीन अधिकारी एम. एस. जाधव आमच्या मदतीला धावले आणि आम्ही सगळ्यांनी मिळून मा. कुलगुरूंना विचारल्यानंतर ते म्हणाले हे सर्व धार्मिक असल्यामुळे दिंडी काढता येणार नाही. पुढच्या दहा बारा मिनिटात ही दिंडी कशी धार्मिक नाही? हे पटविण्यात आम्हाला यश आले. पालखीमध्ये कुठल्याही देवाचा फोटो ठेवलेला नसतो. तर फक्त झाडांची रोपे ठेवलेली असतात. हे सांगितल्यावर एकदाचे रात्री 9 वाजता या दिंडीला होकार दिला. आणि दिंडी एकदाची चालू झाली.
       2010 साली मी इंदापूरला प्राचार्य म्हणून आलो. नंतरच्या काळात माझ्या कानावर आले की एका प्राध्यापकाने एका वर्षी दिंडीत तुळशीच्या माळा विद्यार्थ्यांना बळजबरीने घालून त्यांना शपथ घ्यायला लावली. हे कुठेतरी धार्मिकतेचे लक्षण होतं कारण दिंडीमध्ये येणारे विद्यार्थी सर्व जाती, धर्माचे पंथाचे असतात. नंतर ही दिंडी बंद करण्याचा प्रयत्न झाला. पण तो टिकला नाही. डॉ. पंडित शेळके त्यांनी श्री संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या दिंडीबरोबर ही दिंडी काढली आणि एक नवा आयाम या योजनेला दिला.
        यावर्षी श्री राजेश पांडे सरांनी  कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू नेहरू उमराणी या सगळ्यांनी मिळून वारीचे आयोजन करण्याचे ठरवले. आणि यातूनच
   मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासमोर चार मिनिटात जे सादरीकरण केले त्यात 50 लाख पत्रावळी, 35 हजार विद्यार्थी, 5 विद्यापीठे सहभागी होणार त्‍यात आरोग्य शिबीर, चष्मे वाटप, स्वच्छता करणे, पत्रावळ्या उष्टावळ्या गोळा करणे, पत्रावळ्याचं नैसर्गिक खत तयार करणे, असा भला थोरला कार्यक्रम.
         गेल्या पन्नास वर्षात पहिल्यांदा मंत्रालयात सादर करण्याची रा से यों ला संधी मिळाली.  त्यामुळे ही संधी डावलून चालणार नव्हती.
         डॉ.प्रभाकर देसाई यांनी अतिशय नेटकं सादरीकरण तयार केलं होत. 4 ते 5 मिनिटात मी अतिशय प्रमाणबद्ध खड्या आवाजात सादरीकरण केलं. राजेशजींनी या दिंडीच्या impact बद्दल सविस्तर निवेदन केले.  6 मंत्री व त्यांचे सचिव, संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित होते. गिनीज रेकॉर्डच्या कार्यक्रमानंतर मा. मुख्यमंत्र्यांशी बोलायचे ठरले आणि शासकीय आदेश निघाले वनविभागाकडून 20000 रोपे मिळाली. तसेच इतर विभागाकडून भरीव मदत मिळाली. आणि अशा पद्धतीने ही 15 वी दिंडी सकल संपूर्ण झाली.
वारी ते वारी 2004 ते 2019 ची वारी हा सुखानुभव आहे ही एक प्रकारची अनुभूती आहे.

   *ज्ञानसूत*
*संजय चाकणे*

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट